- डॉ. सोमनाथ कोमरपंत
रविकिरणमंडळातील प्रमुख कवी म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. साहित्यसाधनेपलीकडे अन्य प्रकारच्या जीवनात त्यांना गोडी वाटत नव्हती. बुलंद स्वरात त्यांनी राष्ट्रभक्तीचा अंतःस्वर जनमानसापर्यंत नेला.
प्रथितयश कवी यशवंत यांची ओळख मराठी काव्यजगतास करून देण्याची आवश्यकता नाही. समर्थ रामदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या चाफळ या गावी त्यांचे बालपण गेले. हा संस्कार त्यांना जन्मभर पुरला. सातारच्या परिसरातील मांडवी नदीकाठच्या पुण्यसंचिताचाही प्रभाव त्यांच्यावर पडला. सांगलीला शिक्षण घेत असता कवी साधुदास यांचा सहवास, मार्गदर्शन आणि प्रेरणा त्यांना मिळाली. शिक्षण अपुरे राहिले. आयुष्याचा प्रवास तसा खडतरच झाला. तो फार विस्ताराने सांगावा लागेल. पण पुण्याचे वास्तव्य त्यांच्या काव्यजीवनास पोषक ठरले. वाङ्मयीन बहरास कारणीभूत ठरले. त्यांचे एकवीस कवितासंग्रह रसिकमान्य ठरले. रविकिरणमंडळातील प्रमुख कवी म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. साहित्यसाधनेपलीकडे अन्य प्रकारच्या जीवनात त्यांना गोडी वाटत नव्हती. बुलंद स्वरात त्यांनी राष्ट्रभक्तीचा अंतःस्वर जनमानसापर्यंत नेला. सर्वसामान्य माणसाच्या सर्व प्रकारच्या भावानुभूतीचे तन्मयतेने चित्रण केले. ‘बंदिशाळा’ व ‘जय मंगला’ ही खंडकाव्ये लिहिली. ‘छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य रचले.
‘तुरुंगाच्या दारांत’ या कवितेत सुरुवातीलाच स्वातंत्र्याची अदम्य आकांक्षा व्यक्त झाली आहे. कारागृहाच्या भिंती कितीही वाढू देत, माझ्या मनाला त्याची पर्वा वाटत नाही असे कवी म्हणतो. उंच भिंतीच्या बंधनांत आत्मा कोंडून राहू शकतो का? तो रात्रंदिवस मुक्तच राहतो. या संपूर्ण कवितेतून कवीच्या तोंडून राष्ट्रभक्ताच्या भावनांचा ओघ व्यक्त झाला आहे.
राष्ट्रभक्तीला जो अंतःकरणात पूर येतो तो पायरीपायरीने वाढतच राहतो. दगडाच्या तटांनी तो अडवून धरला म्हणून काय तो ओसरतो? अडविल्याने तो फोफावत जातो.
एक कल्पना कवीला सुचलेली आहे. अंजनीसुत हनुमान जन्मतःक्षणीच फळ समजून सूर्यबिंबाकडे झेपावला. माझ्या मनावर तोच संस्कार बिंबवला गेला आहे. या आत्मप्रकटीकरणामुळे या अभिव्यक्तीला अभिजात वळण मिळाले आहे.
सैतानाने अमानुषतेचे जे थैमान घातले ते गिळण्यासाठी मी सज्ज झालेलो आहे असे कारावासात खितपत पडलेला देशभक्त म्हणतो. ‘घालिती सैतानसे शत्रू इथें थैमान जें’ या शब्दांतील पदन्यास बघण्यासारखा आहे. त्यामुळे नादलय निर्माण झाली आहे. हा नाद गुलामगिरीच्या शृंखलांचा आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्ताच्या मनातील अभंग जिद्द व्यक्त झाली आहे.
राष्ट्रभक्ताचे अहोभाग्य कोणते? कवीने ते समर्थपणे सांगितले आहे. कधी अग्निकुंडाच्या फुफाट्यात, कधी जटिल काटेरी मार्गात तर कधी बंदिखान्याच्या कुबट हवेत त्याला दिवस कंठावे लागतात.
हेच जणू त्याच्या भावजीवनातील ‘विलास’ असतात. त्याच्या जीवनाची जोपासना अशा प्रसंगांतून होत असते. यांहून त्याच्या जीवनाला दुसरी झळाळी नसते.
देशभक्त उद्गारतो, ‘‘हे हिंदमाते, मी गोंधळी आहे. राष्ट्रप्रेमाची संबळ वाजवीत आहे. ती हातात धारण करताना माझ्या हातांत बळ येते. पेटलेली मशाल मी माझ्या हातातील तेलाने तेवत असतो, आणि ती सर्वत्र खेळवीत असतो.
या दर्याखोर्यांतून सर्वत्र संचार करीत मी स्वातंत्र्यगीतांचे नादनिनाद निर्माण करीत आहे असे देशभक्त आत्मविश्वासयुक्त वाणीत सांगतो. आज निर्भय अंतःकरणाने तुझ्यासाठी या मंदिरात मी विश्रांतीसाठी आलेलो आहे. हे सारे तुला मान्य आहे ना?
तुझ्या कृपेचा सागर माझ्या मस्तकात उचंबळून आला असता वाट्याला आलेल्या अनंत यातनांची काय कथा?
अशावेळी अग्नीदेखील चंदनाचे विलेपन वाटेल किंवा अमृताचे सिंचन वाटेल. पायांत शृंखला अडकलेल्या असताना मला मंत्राचा नाद रुमझुमताना जाणवतो.’’ या अंतर्विरोधी लयीतून देशभक्ताच्या आंतरिक निष्ठांचे अधोरेखन झालेले आहे.
देशभक्त शेवटी उद्गारतो,‘‘स्वातंत्र्यसूर्याने लवकरात लवकर भारतीय क्षितिजावर दर्शन द्यावे, तेव्हाच आम्ही पावन होऊ.’’
यशवंतांच्या आत्मनिर्भर वाणीतील या कवितेमुळे तत्कालीन समाजमानसात आशेची संजीवनी जागवली गेली असणार हे निश्चित!