तुये पेट्रोल पंपजवळ आर्टिका (जीए 11 टी 1672) आणि दुचाकी जीए 03 एके 6125 यांच्यात समोरासमोर अपघात होऊन दुचाकीचालक राज पेडणेकर (25) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी दि. 18 रोजी सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान घडली.
सविस्तर माहितीनुसार आर्टिका ही गाडी तुये येथील पेट्रोल पंपवर पेट्रोल घालण्यासाठी वळत होती. मात्र हा पेट्रोल पंप बंद असल्याने चालक परत गाडी वळवत असतानाच विरुद्ध दिशेने तुयेमार्गे पेडण्याला दुचाकीने जाणारा राज पेडणेकर हा अचानक समोर आला. या दोन्ही वाहनांना एकमेकांचा काहीच अंदाज न आल्यामुळे त्यांची धडक बसली. यात दुचाकीस्वार राज पेडणेकर हा जागीच ठार होण्याची घटना घडली. राज पेडणेकर हा मूळ डिचोली येथील असून तो शिवोली येथे राहत होता. सुरुवातीला काही काळ त्याने गॅरेज चालवण्याचे काम केले होते. त्याच्यासोबत त्याचा एक भाऊ आणि आई आहे. वडील नाहीत. भाऊ बारावीमध्ये शिकत असून तो परीक्षा देण्यासाठी गेला होता.
मांद्रे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी पंचनामा केला. यावेळी त्यांनी नेमळे वेंगुर्ला येथील वाहनचालक सौरव गुडेकर याला अटक केली.
तुये येथील जो पेट्रोल अनेक दिवस बंद आहे. मात्र हे लक्षात येत नसल्यामुळे वाहन चालक पेट्रोलसाठी तिथे जातात. परंतु तिथे गेल्यावर ग्रीन नेट लावून पंप बंद केल्याचे निदर्शनास आल्यावर लगेच वाहन चालकांना वळतात. मात्र त्यावेळी पुढून किंवा मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही व असे अपघात घडतात.