तुका म्हणे…

0
49
  • ज. अ. रेडकर

‘भले तरी देऊ कांसेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ असे रोखठोक बजावणारे कुणी आता शिल्लक उरलेले नाहीत. उलट सनातनी मुखवटा लेवून सत्तेच्या खुर्चीत बसण्याची सर्वांची धडपड चाललेली दिसते.

संत तुकाराम महाराजांना विद्रोही कवी म्हटले जाते. कारण त्यांनी आपल्या अभंगांतून समाजातील अनिष्ट चालीरीतींवर कठोर शब्दांचे आसूड ओढले. याच रागातून पंढरीच्या बडव्यांनी त्यांची गाथा चंद्रभागेत बुडवली. परंतु त्यांचे विचार ते बुडवू शकले नाहीत. कारण भजन-कीर्तनातून त्यांचे विचार सर्वदूर पसरले होते आणि अनेकांच्या मुखातून ते आणखी दूरवर पोहोचत होते. त्यांच्या टाळकरी मित्रांनी त्यांच्या अभंगाच्या अनेक प्रती लिहून काढल्या होत्या म्हणूनच हा अभंगांचा खजिना चारशे वर्षे होऊन गेली असतानादेखील गाथेच्या रूपाने अस्तित्वात आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे त्याचसाठी म्हटले जाते. भक्तीचा मळा फुलवणारे तुकोबा आपल्या अभंगांतून आजही समाजप्रबोधन करीत असतात. महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रदेशात होणाऱ्या आरती-भजनातून त्यांचे अभंग म्हटल्याशिवाय भजनाची पूर्तता होत नाही. तुका आकाशाएवढा कधी झाला हे कळलेच नाही आणि दुष्ट बडव्यांच्या तोंडचे पाणी पळाले.

इ. स. 1608 साली (माघ शुद्ध पंचमी) देहू इथे जन्मलेले तुकाराम महाराज यांनी 19 मार्च 1650 रोजी या विश्वातील अखेरचा श्वास घेतला. अवघे 42 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. परंतु या अल्पायुष्याच्या काळातही त्यांनी लिहिलेल्या अलौकिक अशा 248 अभंगांची रचना आज उपलब्ध आहे. या अभंगांच्या माध्यमातून त्यांनी दीनदुबळ्यांच्या मनात विठ्ठलभक्तीची ज्योत सतत पेटत ठेवली. तुकाराम बोल्होबा आंबिले ऊर्फ मोरे हे त्यांचे पूर्ण नाव. (संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे हे त्यांचे 13 वे वंशज.) वंशपरंपरेने चालवला जाणारा व्यापार हा यांच्या उपजीविकेचा आधार होता. गावात सावकार म्हणून त्यांचा लौकिक होता. व्यापार आणि व्यवहार त्यांना कधी जमलाच नाही. दुष्काळ पडताच त्यांनी आपल्या कोठारातील सर्व धान्य उपासमारीने तडफडणाऱ्या लोकांना वाटून टाकले. ज्यांच्या जमिनीचे गहाणकागद त्यांच्या तिजोरीत बंद होते ते त्यांनी परत केले. स्वतः कफल्लक झाले. असा हा उदार अंतःकरणाचा व्यापारी आणि सावकार होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची ही महती समजताच त्यांनी त्यांच्यासाठी सुवर्णमुद्रा, दागदागिने, भरजरी वस्त्रे आणि पालखी पाठवली. परंतु हे सगळे चालून आलेले वैभव त्यांनी ‘सोने नाणे आम्हां मृत्तिके समान’ असे म्हणून निःस्पृहपणे परत केले. आजच्या जमान्यात असे निस्पृह साधू, बाबा, संन्यासी, महाराज सापडणे मुश्कील आहे. उलट राजाश्रय मिळावा म्हणून सत्तेशी सलगी करणारे आणि त्यांचा प्रचार-प्रसार करणारेच अधिक सापडतील.

तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सूत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य आहे. संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत- कवी होते. पंढरपूरचा विठोबा हे त्यांचे आराध्यदैवत. वारकरी समाज तुकारामांना ‘जगद्गुरू’ म्हणून ओळखतो. बाबा चैतन्य हे त्यांचे आध्यात्मिक गुरू होत! वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी- ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. ‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥’ अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वरभक्तीचा सुगम मार्ग दाखवला. संत तुकाराम महाराज परमेश्वराकडे एकच मागणे मागतात, ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा। गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी॥’
वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी पायी चालून जाणे हा वारकऱ्यांसाठी एक आगळावेगळा सोहळा असतो. चंद्रभागेत स्नान उरकून विठ्ठलाचे मुख पाहणे, त्याचे चरणस्पर्श करणे हा भावूक प्रसंग असतो. अनेक भक्तांच्या डोळ्यातून अशावेळी आनंदाश्रू ओघळतात.

तुकाराम महाराज वास्तववादी, निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दप्रहार करणारे संत अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या भूमीत त्या काळी अनागोंदी निर्माण झाली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले. त्यांच्या अभंगाच्या शेवटी ‘तुका म्हणे’ असे उद्धृत केले जाते. आज या ‘तुका म्हणे’चा वापर मिस्कीलपणे केला जातो हा भाग अलाहिदा! जसे की- ‘तुका म्हणे उगी रहावे। जे जे होईल ते ते पहावे मुकाट्याने॥’
वाढती महागाई, सुशिक्षितांची बेरोजगारी, स्त्रियांवर होणारे अत्याचार, दिवसाढवळ्या- अगदी पोलिसांच्या देखत होणारे गोळीबार/खून असे आजचे दिवस आले आहेत आणि याविरुद्ध समाजातून एक चकार शब्ददेखील उमटत नाही ही खेदाची बाब म्हणावी लागेल. अशावेळी संत तुकाराम महाराजांची आठवण तीव्रतेने होते. ‘भले तरी देऊ कांसेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ असे रोखठोक बजावणारे कुणी आता शिल्लक उरलेले नाहीत. उलट सनातनी मुखवटा लेवून सत्तेच्या खुर्चीत बसण्याची सर्वांची धडपड चाललेली दिसते.
असो! तुका म्हणे उगी रहावे। होईल ते ते पाहावे आणि भोगावे मुकाटपणे॥