पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पानिपतमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) विमा सखी योजनेचा शुभारंभ केला. ज्यामध्ये विमा सखी बनणाऱ्या 18 ते 70 वयोगटातील महिलांना दरमहा 5 ते 7 हजार रुपये मिळणार आहेत. दरम्यान, कर्नाल येथील महाराणा प्रताप हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटीच्या मुख्य कॅम्पसची पायाभरणीही पंतप्रधानांनी यावेळी केली.
विमा सखी योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तीन वर्षांसाठी ही मानधन योजना असणार असून, त्या कालावधीत 2 लाख रुपये मिळणार आहेत. पहिल्या वर्षी दरमहा 7 हजार, दुसऱ्या वर्षी 6 हजार आणि तिसऱ्या वर्षी 5 हजार रुपये मानधन स्वरूपात मिळतील.
निवडणुकीत मोदी कसे जिंकतात याची विरोधकांना काळजी असते. विरोधक निवडणुकीच्या वेळी महिलांसाठी केवळ घोषणा करून राजकारण करतात. मात्र आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात मी प्रत्येक घरात शौचालय, उज्ज्वला योजना, नळ यासारख्या योजना राबवल्या. त्यामुळे मला माता-भगिनींचे आशीर्वाद मिळत आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले.