आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने काल रविवारी 15 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
पुढील महिन्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 229 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील 144, छत्तीसगडमधील 30 आणि तेलंगणातील 55 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.
पक्षाने छिंदवाडामधून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना तिकीट दिले आहे. बुधनीमधून मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या विरोधात विक्रम मस्ताल यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ पाटणमधून, तर उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांना अंबिकापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला आणि छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला, मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला आणि तेलंगणात 30 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. 3 डिसेंबरला 5 राज्यांतील निकाल जाहीर होतील.
काँग्रेसने मध्य प्रदेशातील 230 जागांपैकी 144 जागांसाठी नावे जाहीर केली आहेत. छत्तीसगडमधील 90 जागांपैकी 30 जागांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. येथे 60 जागा शिल्लक आहेत. तेलंगणातील 119 जागांपैकी 55 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. येथील 64 जागांसाठी नावे येणे बाकी आहे. तीन राज्यांतील 210 जागांसाठीच्या उमेदवारांची नावे येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशात भाजपच्या 4 याद्या
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत, त्यापैकी भाजपने 136 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने 17 ऑगस्ट रोजी पहिली यादी जाहीर केली होती ज्यामध्ये 39 उमेदवारांची नावे होती. यानंतर 25 सप्टेंबर रोजी दुसऱ्या यादीत 39 उमेदवारांची नावे होती. 26 सप्टेंबर रोजी तिसऱ्या यादीत मोनिका सिंग बत्ती यांना अमरवाडा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. भाजपने 9 ऑक्टोबर रोजी चौथी यादी जाहीर केली. यामध्ये 57 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या यादीत 24 मंत्र्यांसह सर्व विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे.
छत्तीसगडमध्ये भाजपचे
85 उमेदवार जाहीर
छत्तीसगडमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या दोन याद्या आल्या आहेत. पहिल्या यादीत 21 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. दुसऱ्या यादीत 64 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा असून भाजपने 85 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.