तीन मच्छीमारी नौका बुडाल्या, २५ खलाशांना वाचवण्यात यश

0
43

>> जीवितहानी नाही पण लाखो रुपयांचे नुकसान

राज्यातील मासेमारी व्यवसाय सुरू होऊन तीन दिवस झालेले आहेत मात्र या तीन दिवसांत समुद्रात मच्छीमारी तीन नौका उलटण्याच्या घटना घडल्या. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या नौकांवरील २५ खलाशांना वाचवण्यात यश आले मात्र नौका बुडाल्यामुळे व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. समुद्र खवळलेला असून वादळी वार्‍याचा तडाखा बसल्यामुळे तीन बोटी उलटल्या. सोमवारी कोलवा येथे मासेमारीसाठी मच्छीमारांना घेऊन गेलेली बोट वादळी लाटांमुळे उलटली. त्यामुळे बोटीतील १५ खलाशी पाण्यात पडले.

किनार्‍यावरील जीवरक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी समुद्रात जाऊन त्या खलाशांना सुखरूप किनार्‍यावर आणले. तसेच वार्का आणि बाणावली येथे दोन नौका उलटल्या. त्या बोटीवरील १० जणांना वाचवण्यात आले. वार्का येथे लाटांमुळे होडी फुटली. मात्र त्यातही कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच वादळी वार्‍यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यांची हानी झाली. सध्या समुद्र खवळलेला असल्यामुळे बोटी उलटण्याच्या घटना घडत आहेत.

दरम्यान, साळ नदीच्या मुखावर खराब हवामानामुळे वाळूचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे मच्छीमारी ट्रॉलर बाहेर काढता येत नाहीत. तसेच खवळलेल्या समुद्रामुळे बोटी पाण्यात घालणे धोकादायक असल्याचे मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष विनय तारी यांनी सांगितले. सोमवारी १० तर काल मंगळवारी ५ होड्या समुद्रात गेल्या. परंतु समुद्र शांत झाल्यानंतरच त्या परततील असे तारी यांनी सांगितले.