तीन तालुक्यांतील जमिनीच्या किमान दरांत वाढ

0
4

राज्य सरकारच्या महसूल खात्याने तिसवाडी, मुरगाव आणि सासष्टी या तीन तालुक्यांमध्ये जमिनीच्या किमान किमतीत वाढ करणारी अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारने गेल्या सप्टेंबरमध्ये बार्देश आणि पेडणे तालुक्यातील जमिनीची किमान किंमत वाढविली होती. त्यानंतर आता आणखी तीन तालुक्यातील जमिनीच्या किमान किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे.

तिसवाडीमध्ये जमिनीची किमान किंमत 5 हजार रुपये प्रति चौरस मीटर ते पंचवीस हजार रुपये प्रति चौ.मी. अशी करण्यात आली आहे. तिसवाडीतील जमिनीचे जुने दर 600 रुपये ते 6 हजार रुपये प्रति चौ. मी. असे होते.
सासष्टीमध्ये जमिनीची किंमत 5 हजार रुपये प्रति चौ. मी. ते 20 हजार रुपये प्रति चौ. मी. अशी वाढवण्यात आली आहे. सासष्टीमध्ये जमिनीचे जुने दर 480 रुपये ते 10 हजार 906 रुपयांपर्यंत होते.
मुरगाव तालुक्यामध्ये किमान किंमत 8 हजार ते 25 हजार रुपये प्रति चौ. मी. अशी वाढवण्यात आली आहे. मुरगावातील जुना दर 420 रुपये ते 4200 रुपयांपर्यंत होता.

राज्य सरकारने जमिनीच्या किमान किमतीमध्ये वाढ केलेली असली तरी 500 चौ.मी. पर्यंतच्या क्षेत्रासाठी झोन एस 1 ते एस 4 मध्ये जमिनीचा किमान दर 30 टक्क्यांनी कमी केला जाणार आहे, असे अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.
पणजी महानगरपालिका क्षेत्रात जमिनीचा जुना दर 3600 रुपये ते 6 हजार रुपये प्रती चौ.मी. असा होता. आता, पणजीतील जमिनीची किमान किंमत 25 हजार रुपये करण्यात आली आहे. विकसित होणाऱ्या विभागामध्ये असलेली 3600 ते 4800 किमान किंमत आता 25 हजार, 20 हजार, 15 हजार प्रति चौ. मी. अशी करण्यात आली आहे. ग्रामीण विभागात 600 रुपये, 1200 रुपये, 3 हजार रुपये, 4200 रुपये किमान किंमत असलेल्या जमिनीची किंमत आता 5 हजार, 10 हजार, 12 हजार, 15 हजार अशी करण्यात आली आहे.

सासष्टी तालुक्यात मडगावातील जमिनीचे नवे दर 20 हजार रुपये प्रती चौ. मी. असे करण्यात आले आहेत. मडगावातील 8622, 9900 आणि 10906 चौ. मी. अशी जुने दर होते. कुंकळ्ळी येथील जमिनीची किंमत 2400 रुपयांवरून 8 हजार रुपये प्रति चौ. मी. करण्यात आली आहे. विकसित होणाऱ्या नावेली, आके, नुवे दवर्ली या भागातील जमिनीची किमान किंमत 12 हजार, 15 हजार रुपये करण्यात आली आहे. ग्रामीण विभागातील जमिनीची किमान किंमत 5 हजार, 8 हजार, 10 हजार आणि 12 हजार रुपये प्रती चौ. मी. अशी करण्यात आली आहे. किनारी भागातील बाणावली, कोलवा, बेताळभाटी, वार्का आदी भागातील जमिनीची किंमत 8 हजार, 10 हजार, 12 हजार आणि 15 हजार रुपये प्रति चौ.मी. अशी करण्यात आली आहे.

मुरगाव तालुक्यातील वास्कोतील सर्व प्रभागातील जमिनीची किमान किंमत 20 हजार रुपये प्रती चौ. मी. अशी करण्यात आली आहे. विकसित होणाऱ्या कुठ्ठाळी, सांकवाळ, चिंचिणी, दाबोळी येथील जमिनीची किमान किंमत 18 हजार, 20 हजार आणि 25 हजार रुपये प्रती चौ. मी. अशी करण्यात आली आहे. ग्रामीण विभागातील जमिनीची किंमत 8 हजार ते 12 हजार रुपये करण्यात आली आहे. किनारी भागातील गावातील जमिनीच्या किमान किमतीत 8 हजार, 10 हजार, 12 हजार, 15 हजार रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.