तीन खाणपट्ट्यांच्या लिलावातून राज्य सरकारला मिळणार 180 कोटी

0
7

राज्य सरकारला तिसऱ्या टप्प्यातील तीन खनिजपट्ट्यांच्या लिलावातून प्रारंभी सुमारे 180 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे, अशी माहिती खाण खात्याचे संचालक नारायण गाड यांनी काल दिली.

खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याने खाणपट्ट्यांच्या तिसऱ्या लिलावात होंडा, कोडली आणि कुर्पे-सुळकर्णे या तीन खाणींच्या लिलावाची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण केली. तथापि, कुर्पे-सुळकर्णे येथील खनिज पट्ट्याची सर्वाधिक बोलिदार कंपनीच्या नावाची घोषणा काही तांत्रिक कारणांमुळे झालेली नाही, अशी माहिती गाड यांनी दिली. कुर्पे-सुळकर्र्णे खनिज पट्ट्याच्या लिलावाला अग्रवंशी खाण कंपनीने घेतलेल्या आक्षेपानंतर या खनिज पट्ट्याची अंतिम बोली निश्चित झाली नाही. या खाण पट्ट्यासाठी वेदांत कंपनीने बोली लावली होती. या बोलीच्या अंतिम टप्प्यात सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे खाण विभागाने लिलावाची प्रक्रिया घेणाऱ्या एमएसटीसीला अहवाल सादर करण्याची सूचना केली असून, त्यानंतर अंतिम बोलीदार घोषित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

खाण खात्याने चौथ्या टप्प्यातील खनिजपट्ट्यांच्या लिलावाच्या तयारीला सुरुवात केली आहे. दक्षिण गोव्यातील अनेक खाणी जैवसंवेदशील क्षेत्रात येत आहेत. त्यामुळे जैवसंवेदनशील क्षेत्राच्या बाहेर येणारे खनिजपट्टे लिलावासाठी तयार करण्याकडे लक्ष दिला जात आहे, असेही नारायण गाड यांनी सांगितले.