गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी, तात्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याकडे 12 ते 14 आमदार होते. आपणाकडे केवळ तीन आमदार आहेत. त्यामुळे आपण गोवाभर फिरून लोकसंपर्क वाढवू शकत नाही असे वक्तव्य केल्याने राजकीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
गोव्यातील एका स्थानिक पक्षाचे 1980च्या काळातील एक आमदार जे अजूनही सक्रीय आहेत त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना आमच्या पक्षाकडे त्यावेळी केवळ दोन ते तीन आमदार होते. परंतु आम्ही गोव्यातील कानाकोपऱ्यात फिरून लोकसंपर्क वाढवला होता, असे आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर बोलताना सांगितले. युरी आलेमांव हे तरुण असून त्यांनी आळस सोडून संपूर्ण गोवा ढवळून काढावा, असा सल्ला त्यांनी दिला. विरोधी आमदारांकडे पोलीस, सुरक्षा, सरकारी गाडी, पोलीस सुरक्षा, कर्मचारी वर्ग, कार्यालय असे सगळे काही आहे. त्याचा फायदा करून घेत त्यांनी राज्यभर फिरून विरोधी पक्षनेते म्हणून चांगले काम करावे, असे अपेक्षित असल्याचे सांगितले.
ज्योकीम आलेमांव यांचे एक खंदे कार्यकर्ते असलेल्या कुंकळ्ळी येथील एका कार्यकर्त्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर बोलताना युरी आलेमांव यांनी आमदार होण्यापूर्वी आपण कुंकळ्ळीत घर घेतले असून तेथेच स्थायिक होणार असल्याचे जाहीर केले होते याची आठवण करून देत ते कुंकळ्ळीत स्थायिक होण्याचे सोडाच, सध्या तेथील आपल्या कार्यालयातही उपलब्ध नसतात असा आरोप केला.