तिसवाडीला मेपर्यंत मर्यादित पाणी

0
227

>> ओपातून कमी पुरवठ्यामुळे समस्या

ओपा प्रकल्पातून तिसवाडी तालुक्यातील पाच मतदारसंघात सध्या १० एमएलडी पाण्याचा कमी पुरवठा होत असल्याने राजधानी पणजीसह ताळगाव, बांबोळी, सांताक्रुझ, मिरामार, सांतआंद्रे या भागात मर्यादित पाणीपुरवठा करावा लागत आहे. ओपा पाणी प्रकल्पात नवीन २७ एमएलडी पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम मे -२०१८ मध्ये पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठ्यात सुसूत्रता येेऊ शकते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप ढवळीकर यांनी काल दिली.

तिसवाडी तालुक्यात नवनवीन बांधकामामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. परंतु ओपा पाणी प्रकल्पातील पाणी शुद्धीकरण मर्यादा न वाढल्याने वाढीव पाण्याच्या मागणी पूर्ण होत नाही. पाण्याचे वितरण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ओपा पाणी प्रकल्पातून तिसवाडी तालुक्यातील पाच मतदारसंघांसाठी दरदिवशी ५८ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यातील १६ एमएलडी कुंभारजुवा मतदारसंघाला दिले जाते. तर ४२ एमएलडी पाण्याचे वितरण पणजी, ताळगाव, सांताक्रुझ आणि सांत आंद्रे या चार मतदारसंघात केले जाते. यात बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि परिसराचा समावेश होतो. मर्यादित पाणी पुरवठ्यामुळे काही नागरिकांना दिवसातून केवळ दोन तास पाण्याचा पुरवठा केला जातो. तर सांत आंद्रे मतदारसंघातील काही भागात दोन दिवसातून एकदा पाण्याचा पुरवठा केला जातो. काही वेळा वीज पुरवठ्यामुळे पाणी शुद्धीकरणामध्ये व्यत्यय आल्यास चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पणजी किंवा परिसरात पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे पणजी व इतर भागांना मुबलक पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने गांजे उसगाव येथे २५ एमएलडी पाणी प्रकल्प, ओपा येथे २७ एमएलडी पाणी प्रकल्प आणि म्हैसाळ, पंचवाडी येथे १० एमएलडी नवीन पाणी प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ओपा आणि म्हैसाळ येथील प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. काही कारणास्तव गांजे येथे नवीन पाणी प्रकल्पाचे काम रेंगाळत पडले आहे. म्हैसाळ व ओपा येथील दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पणजीला पंचवीस ते तीस एमएलडी पाणी उपलब्ध होऊ शकते, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

वेर्णा – बांबोळी नवीन जलवाहिनी
बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटल तसेच सांत आंद्रे मतदारसंघात मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी वेर्णा ते बांबोळी दरम्यान नवीन जलवाहिनी घालण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. साधारण २२ किलो मीटर जलवाहिनी घालावी लागणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.