>> तीन दिवसांत सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न ः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील अनेक भाग आणि फोंडा तालुक्यातील काही भागातील नळ गुरुवारपासून कोरडे पडल्याने नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. खासगी आणि सरकारी टँकरच्या माध्यमातून विविध भागात पाण्याचा पुरवठा करून काही प्रमाणात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथापि, टँकरच्या माध्यमातून होणारा पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. दरम्यान, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला जोरात सुरुवात करण्यात आली आहे. जलवाहिनीची दुरुस्ती करून येत्या तीन दिवसात पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. नागरिकांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. नागरिकांनी थोडी कळ सोसावी, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
ओपा पाणी प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच दोन मोठ्या जलवाहिन्या एकाच वेळी फुटण्याची मोठी दुर्घटना घडलेली आहे. राष्ट्रीय महामार्गाची संरक्षक भिंत कोसळल्याने ९०० मिमी आणि ७५० मिमी अशा दोन मोठ्या प्रमुख जलवाहिन्या फुटल्या आहेत. या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी प्रथम संरक्षक भिंतीचे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे.
कुर्टी – केरये खांडेपार येथील राष्ट्रीय महामार्गाची संरक्षक भिंत गुरूवारी कोसळल्याने राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्याला पाण्याचा पुरवठा करणार्या दोन प्रमुख जलवाहिन्या फुटल्याने या भागातील नळ कोरडे बनले आहेत.
राजधानी पणजीसह ताळगाव, सांताक्रुझ, सांतआंद्रे, कुंभारजुवा, ओल्ड गोवा व इतर भागातील नागरिकांना सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. फोंडा तालुक्यातील भोम, माशेल या भागात पाण्याची टंचाई आहे.
पणजीतील भाजपच्या नेत्यांनी खासगी टँकरद्वारे नागरिकांच्या मागणीनुसार पाण्याचा पुरवठा करायला सुरुवात केली आहे. पाण्याची मागणी जास्त असल्याने खासगी टँकर पाणी पुरवठ्यासाठी अपुरे आहेत. पणजीतील नागरिकांकडून स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून आमदार बाबूश मोन्सेरात, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्याशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याकडून खासगी टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातो.
सांतइनेज पणजी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागात टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी आत्तापर्यंत २०० पेक्षा जास्त नागरिकांनी नोंदणी केली आहे. पाणी पुरवठा विभागाने नोंदणी केलेल्या नागरिकांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु, अपुर्या टँकरच्या अभावामुळे नागरिकांना वेळेवर पाण्याचा पुरवठा करण्यात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सरकारच्या पाणी पुरवठा करणार्या टँकरला पर्वरी येथून पाणी भरून आणावे लागत आहे. पर्वरी येथे योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यामध्ये अडचणी येत आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली.
पणजीत टँकरसाठी
दोनशेहून अधिकांची नोंदणी
पणजी शहरात खासगी टँकरद्वारे पाणी मिळविण्यात अडचण येत आहे. खासगी टँकरवाल्याकडून अनेक इमारत संकुल, हॉटेल्स व इतर आस्थापनांना पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात नागरिकांची टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी वाढली आहे. राजकीय नेत्यांकडून खासगी टँकर चालकांचा पाणी पुरवठ्यासाठी वापर केला जात आहे. पाण्याची मागणी जास्त असल्याने टँकरद्वारे केला जाणारा पाणी पुरवठा अपुरा आहे. अनेक भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे.
गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये गैरसोय
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये पाण्याच्या टंचाईमुळे रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे. हॉस्पिटलमध्ये पाणी टंचाईमध्ये स्वच्छतागृहात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णांचे नातेवाइकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेत. त्यांना बाहेरून बाटल्यांमधून पाणी आणावे लागत आहे.
हॉस्पिटलमध्ये योग्य पाणी उपलब्ध करण्यासाठी दरदिवशी २८ टँकर पाणी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून योग्य पाणी पुरवठा होत नसल्याने खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करण्याची सूचना यापूर्वीच करण्यात आली आहे, असेही आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले.