इस्रायल हिज्बुल्लाहचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी दक्षिण लेबनॉनमध्ये आपले पायदळ घुसवण्याच्या प्रयत्नात असतानाच अचानक नाट्यमयरीत्या आणि कोणाच्या ध्यानीमनी नसताना इराणने इस्रायलच्या दिशेने तब्बल दोनशे क्षेपणास्त्रांचा मारा करून रणामध्ये थेट उडी घेतली आहे. आजवर इराण इस्रायलशी थेट संघर्षात न उतरता हिज्बुल्लाहच्या माध्यमातून लढत होता. परंतु ह्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे आता थेट संघर्षाला तोंड फुटण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. आजवर इस्रायल गाझामध्ये हमासशी, लेबनॉन आणि सीरियामध्ये हिज्बुल्लाहशी, येमेनमधील हौथी बंडखोराशी म्हणजे एकाचवेळी चार ठिकाणी शत्रूंशी लढत आलेला होता. आता हिज्बुल्लाहचा खरा पाठिराखा असलेल्या इराणने इस्रायलवर थेट क्षेपणास्त्रांचा एवढा प्रचंड मारा करून दिलेली ललकार केवळ पश्चिम आशियालाच प्रादेशिक युद्धाच्या घातक वळणावर घेऊन गेलेली नाही, तर थेट तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने टाकले गेलेले हे एक पाऊल तर ठरणार नाही ना असा प्रश्नही उपस्थित करून गेली आहे. इस्रायलवर इराणने गेल्या एप्रिलमध्येही क्षेपणास्त्रांचा मारा केला होता, परंतु तो मर्यादित स्वरूपात आणि प्रतिकात्मक स्वरूपाचा व केवळ इशारा देण्यासाठी होता. शिवाय तो इस्रायलच्या सीमावर्ती भागांतील लष्करी तळांपुरता मर्यादित होता. ह्यावेळचा क्षेपणास्त्रांचा मारा संख्येच्या दृष्टीने तर प्रचंड आणि एप्रिलच्या हल्ल्यापेक्षा दुप्पट आहेच, परंतु तो थेट इस्रायलमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या तेल अवीवच्या दिशेने केला गेलेला आहे. इराणने मारा केलेली नव्वद टक्के क्षेपणास्रे आपल्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने हवेतल्या हवेत निकामी केल्याचा दावा इस्रायलने केला आहे, तर आपली नव्वद टक्के क्षेपणास्रे लक्ष्यभेद करून गेल्याचा इराणचा दावा आहे. ह्यातले खरे काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इस्रायलची क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा सक्रिय नसती तर काय संहार झाला असता ह्याची कल्पनाही करवत नाही. इस्रायलने हमासचा नेता हनियेची थेट इराणमध्ये हत्या घडवली होती. नुकताच इस्रायलने हिजबुल्लाहच्या नसरल्लाचा काटा काढला. ह्या दोन्ही घटनांचा सूड म्हणून हा हल्ला चढवला गेल्याचे इराणचे म्हणणे आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचे लक्ष्य यावेळी मोसादचे मुख्यालय आणि इस्रायलचे दोन प्रमुख हवाई तळ होते. तेथे इस्रायलची लढाऊ विमाने तैनात आहेत. ह्या तळांवरूनच सध्या इस्रायल हवाई युद्ध लढते आहे. इराणच्या ह्या क्षेपणास्त्रांनी ह्या तिन्ही ठिकाणांचे प्रत्यक्षात किती नुकसान केले आहे हे स्पष्ट नाही. परंतु इस्रायल ह्याचे प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हेही इराणला ठाऊक आहे आणि तसे झाल्यास अधिक मोठा हल्ला करू अशी धमकीही त्या देशाने दिलेली आहे. हे अत्यंत घातक व विनाशकारी आहे, कारण इराण गुप्तपणे अण्वस्त्रे निर्माण करीत असल्याचा अमेरिकेचा आधीपासून वहीम आहे. त्यामुळे हा विषय अधिक चिघळला तर काय घडेल हे सांगता येत नाही. यावेळी इराणने डागलेली क्षेपणास्रे निकामी करण्यात इस्रायलबरोबरच अमेरिकेच्या नौदलाने आणि मित्रदेश जॉर्डनच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेनेही आपला वाटा उचलला. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तर ‘अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी उभी आहे’ अशी ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव कमालीचा वाढला आहे. आजवर इराणला रशियाचा पाठिंबा राहिला आहे आणि उत्तर कोरिया आणि चीन हेही अमेरिकेचा पश्चिम आशियातील प्रभाव कमी करण्यासाठी इराणला पाठबळ देत आलेले आहेत. त्यामुळे एकीकडे इस्रायलच्या पाठीशी उभी असलेली अमेरिका आणि नाटो राष्ट्रे, तर दुसऱ्या बाजूने रशिया चीन आणि उत्तर कोरिया असा अप्रत्यक्ष संघर्ष ह्यातून उभा राहू शकतो आणि कोणी सांगावे उद्या ती तिसऱ्या महायुद्धाची नांदीही ठरू शकते. सध्या रशिया – युक्रेन युद्धातही युक्रेनच्या पाठीशी नाटो आणि अमेरिका आहेच. त्यामुळे आता इस्रायल – इराण संघर्षातही अमेरिका सक्रिय भूमिका निभावू लागली तर रशिया स्वस्थ बसणार नाही. रशिया – युक्रेन संघर्षात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न भारताने केला होता. परंतु त्या आघाडीवर अद्याप यश आलेले नाही. सध्याच्या संघर्षात भारताला भूमिका घेणे थोडे अवघड आहे, याचे कारण एकीकडे इस्रायल हा भारताचा मित्रदेश जसा आहे, तसाच इराणशीही भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तानमध्ये चीनने विकसित केलेल्या ग्वादार बंदराला शह देण्यासाठी भारताने इराणचे छाबाहर बंदर विकसित केले. अमेरिकेच्या निर्बंधांची तमा न बाळगता इराणकडून तेल आयात सुरू ठेवली. परंतु ह्यावेळी समीकरणे बदलली आहेत. एक काळ असाही होता जेव्हा इराकविरुद्ध इराण आणि इस्रायल एकत्र येऊन लढले होते. आज मात्र तेच एकमेकांच्या उरावर बसले आहेत.