तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी सरकारकडून हालचाली सुरू

0
26

>> अभ्यासासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना; अहवाल सादरीकरणासाठी समितीला 3 महिन्यांची मुदत

राज्यात तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीच्या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी एका 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यांत या समितीला अहवाल सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
फोंडा, सत्तरी, धारबांदोडा या तालुक्यातील भागांचा समावेश करून तिसरा जिल्हा स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. फोंडा हे तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बनविण्याचा प्रस्ताव आहे. राज्यात सध्या उत्तर आणि दक्षिण असे दोन जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील काही भागांचा समावेश करून तिसरा जिल्हा स्थापन करण्याची मागणी गेली कित्येक वर्षे केली जात आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून प्रधान सचिव (वित्त), निवासी आयुक्त, सचिव (महसूल), जिल्हाधिकारी (दक्षिण/उत्तर), मुख्यमंत्र्यांचे सल्लागार चारुदत्त पाणिग्रही यांचा समावेश आहे. या समितीचे सदस्य सचिव राज्य सरकारच्या नियोजन, सांख्यिकी खात्याचे संचालक आहेत.
सरकारने नियुक्त केलेल्या समितीकडून तिसरा जिल्हा निर्मितीच्या प्रस्तावाचा अभ्यास केला जाईल. तिसऱ्या जिल्ह्याच्या सीमा, लोकसंख्या, आर्थिक स्थिती, नवीन जिल्हा निर्मितीचा खर्च, पायाभूत सुविधांची आदी विविध अंगांनी हा अभ्यास केला जाणार आहे.