तिसऱ्या जिल्ह्याचा प्रस्ताव विचाराधिन

0
7

मुख्यमंत्री; अभ्यासासाठी समितीची स्थापना

राज्यात तिसऱ्या जिल्ह्याचा प्रस्ताव विचाराधिन असून, तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्व आमदारांना विश्वासात घेऊन तिसऱ्या जिल्ह्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली.

आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या तिसऱ्या जिल्ह्यासंबंधीच्या खासगी ठरावाला उत्तर देताना ते बोलत होते. सावर्डे, फोंडा, साखळी, वाळपई, प्रियोळ, मडकई, शिरोडा या मतदारसंघाचा विचार करून तिसरा जिल्हा स्थापन करावा आणि मुख्यालय फोंडा येथे करावे. या भागातील नागरिकांना कामानिमित्त पणजी किंवा मडगाव येथे धाव घ्यावी लागते. तिसरा जिल्हा स्थापन केल्यास त्यांची गैरसोय दूर होईल, असा खासगी ठराव डॉ. गावकर यांनी मांडला होता.
सांगे, केपे, सावर्डे, काणकोण या मागास तालुक्यांचा तिसरा जिल्हा स्थापन करताना विचार करण्याची गरज आहे. केपे येथे मुख्यालय सुरू केले जाऊ शकते, असे आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले.

या विषयावर महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही भाष्य केले. सरकार तिसऱ्या जिल्हा स्थापनेच्या प्रस्तावावर विचार करीत आहे. त्याच्या अभ्यासासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तिसरा जिल्हा स्थापन करताना मागास तालुक्यांचा विचार केला जाणार आहे, असे बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.