गेल्या २८ डिसेंबरपासून राज्यात उसळलेल्या कोरोनाच्या तिसर्या लाटेने आपले शिखर ओलांडले असून आता रुग्णसंख्या कमी होऊ लागली असल्याची सुवार्ता राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. आयरा आल्मेदा यांनी दिली आहे. आरोग्य खाते देत असलेल्या दैनंदिन आकडेवारीनुसार राज्यातील सध्याची रुग्णसंख्या पाहिली तर ती आठ हजारांच्याही खाली गेलेली दिसते. गेल्या आठवड्याची सरासरी पाहिली तर नव्या रुग्णांची संख्या कमी दिसते आहे. त्यामुळे डॉ. आल्मेदा यांनी हा निष्कर्ष काढला आहे. मात्र, कोरोनाच्या ह्या तिसर्या लाटेमध्ये त्याची लक्षणे आढळताच चाचणी न करताच थेट औषधोपचार सुरू करण्याकडे जनतेचा कल वाढलेला आहे हे लक्षात घेतले तर हे आकडे दिशाभूल करणारे तर नाहीत ना असा संशय निर्माण झाल्यावाचून राहात नाही. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली किंवा चाचणीत ती व्यक्ती पॉझिटिव्ह आली, तर इतरांना लक्षणे येताच चाचणी न करताच थेट औषधोपचार सुरू करणेच आरटीपीसीआर चाचणी करून अहवाल येईस्तोवर वाट पाहण्यापेक्षा अधिक सोईचे ठरू लागल्याने नागरिकांचा त्याकडे कल दिसत आहे. अँटीजेन चाचणीच्या निष्कर्षांची अचूकता जेमतेम साठ टक्के असते. त्यामुळे चाचणी न करता औषधोपचाराला प्राधान्य देण्याकडे लोकांचा कल दिसतो.
एकीकडे नवी रुग्णसंख्या आणि अर्थातच चाचण्यांची संख्या कमी होत गेलेली दिसते आहे, तर दुसरीकडे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मोठेच आहे. एका जानेवारी महिन्यात तब्बल १७१ व्यक्तींचा गोव्यात कोरोनाने बळी घेतला. गेल्या अठ्ठावीस जानेवारीला २० जण दगावल्याची किंवा गेल्या ३१ जानेवारीला ११ जण दगावल्याची वार्ता आली तेव्हा जनता हादरून जाणे साहजिक आहे. कोरोनाचे नवे व्हेरियंट जर पूर्वीपेक्षा सौम्य आहेत असे मानले, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू का होत आहेत याचे पटण्याजोगे उत्तर सरकारने दिले पाहिजे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये जेव्हा राज्यात मृत्युकांड सुरू होते, तेव्हा लोक इस्पितळात उपचारासाठी उशीरा येतात असा बचाव सरकारने घेतला होता. नंतर कोमॉर्बिडिटी हा परवलीचा शब्द बनला. आता तिसर्या लाटेमध्ये होणारे मृत्यू हे ‘लस न घेतलेल्यां’चे असल्याचे असल्याचे सरकार सांगत आहे. हीच मंडळी काही दिवसांपूर्वी राज्याच्या शंभर टक्के लसीकरणाचे गोडवे गात होती. शंभरपेक्षा अधिक टक्के लसीकरण झाल्याचा दावा जर सरकार करीत होते, तर आता हे लस न घेतलेले हजारो लोक कुठून अवतरत आहेत? जानेवारी महिन्यात राज्यात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ५२ टक्के लोकांनी लस घेतलेली नव्हती अशी कबुली आरोग्य खात्याच्या अधिकार्यांना आता द्यावी लागली आहे. राज्यातील लसीकरण ९९.११ टक्के झालेले असन अजूनही किमान दहा हजार लोकांनी लस घेतलेली नाही अशाही निष्कर्षाप्रत ते आलेले आहेत. म्हणजेच संपूर्ण लसीकरणाचा सरकारचा दावा योग्य नव्हता असा त्याचा अर्थ होतो.
तिसर्या लाटेचे स्वरुप सौम्य असून बहुतांशी रुग्णांना इस्पितळात दाखल करावे लागत नसल्याचे सांगण्यात येत होते, परंतु सध्याच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत इस्पितळात दाखल करावे लागण्याचे प्रमाणही तसे दुर्लक्षिण्याजोगे नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अजूनही ९५ टक्क्यांच्या घरात आहे. याचाच अर्थ तिसरी लाट ओसरली, कोरोना संपला असा समज करून घेऊन जनतेमध्ये पुन्हा बेफिकिरी वाढली तर ते घातक ठरू शकते.
सरकार आणणार असलेले जिनॉम सिक्वेन्सिंग मशीन एकदाचे अवतरले आहे व येत्या पंधरा दिवसांत ते कार्यान्वित होईल अशी सुवार्ताही आरोग्य संचालकांनी दिलेली आहे. आग लागून गेल्यावर विहीर खोदावी तसे हे महागडे यंत्र आता लाट ओसरत असताना येऊन उपयोग काय? जेव्हा रुग्णसंख्या वाढत होती, मृत्युकांड सुरू होते, तेव्हाच खरे तर या यंत्राची आवश्यकता होती. कोरोनाचा नेमका कोणता व्हेरियंट गोव्यात धुमाकूळ घालत आहे हे समजण्यासाठी त्याची नितांत जरूरी होती. परंतु तेव्हा हे यंत्रच उपलब्ध नसल्याने आपल्याला पुण्याहून ते अहवाल येऊन व्हेरियंट समजेपर्यंत बराच काळ गेला. कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या शिखरकाळातील मृत्युसत्र हे डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे होते हे समजायलाच आपल्याला चार महिने लागले होते. आता ओमिक्रॉन व्हेरियंटमुळेच ही तिसरी लाट उसळलेली आहे की मूळ विषाणू अथवा त्याचे डेल्टा किंवा डेल्टा प्लस रूप यामुळे ही तिसरी लाट पसरली आहे हे सरकार सांगू शकत नाही. राज्यात विदेशातून आलेले २१ रुग्ण ओमिक्रॉनबाधित होते एवढेच सरकार आजवर सांगू शकले आहे. तिसर्या लाटेअंती आणखी एखादी लाट उसळू नये. ही महामारी येथेच संपुष्टात यावी अशी कामना करूया!