तिसरा उठाव

0
14

इस्रायल – गाझादरम्यानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन इस्रायल भेटीवर निघाले असतानाच गाझामध्ये अल अहली अरबी इस्पितळात झालेल्या भीषण स्फोटामध्ये पाचशे रुग्ण होरपळून मृत्युमुखी पडल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि ह्या युद्धाच्या नव्या दिशेबाबत चिंता उत्पन्न करणारी आहे. इस्पितळावर आदळलेले क्षेपणास्र हे आपले नसून इस्लामी जिहाद ह्या गाझातील दहशतवादी संघटनेच्या चुकीतून ते इस्पितळावर आदळले असा दावा इस्रायलने केला आहे. मात्र, ह्या मृत्युकांडामुळे संपूर्ण अरब जगतात संतापाची लाट उसळली आहे हेही तितकेच खरे आहे. आपल्या नेहमीच्या रणनीतीप्रमाणे इस्पितळाच्या आडून इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांनी सोडलेले क्षेपणास्र भरकटून इस्पितळावरच आदळले हा इस्रायलचा दावा खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु इस्रायलने ह्या हल्ल्यामागे आपला हात नसल्याचे कितीही सांगितले तरी आतापर्यंत अहोरात्र गाझाला भाजून काढणाऱ्या त्या देशावरच त्याचे खापर फुटणे अपरिहार्य आहे. इस्रायलला शेजारील ईजिप्त, जॉर्डन आणि खुद्द वेस्ट बँकमधून कारभार हाकणाऱ्या पॅलेस्टिनी राजवटीचा पाठिंबा मिळवण्यासाठी इस्रायलमध्ये दाखल होणाऱ्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसाठी देखील हा मोठा झटका आहे. ह्या मृत्युकांडानंतर जॉर्डनने ही चार देशांच्या प्रमुखांची होणारी परिषद रद्द करून टाकली आहे. ठिकठिकाणी इस्रायल आणि अमेरिकेच्या दूतावारांवर हिंसक जमाव चाल करून जातो आहे. गाझामध्ये चाललेल्या रणकंदनाला आता वेगळे आणि घातक वळण मिळण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. हमास आणि इस्लामी जिहाद पुन्हा एकदा दक्षिण इस्रायलमध्ये घुसून निर्णायक अधिक विनाशकारी हल्ला चढविण्याच्या तयारीला लागली आहे. त्यांचा पाठीराखा इराण आणि लेबनॉनमधील हिज्बुल्ला यांची त्यांना साथ तर मिळणार आहेच, परंतु एकेकाळी इस्रायलविरुद्ध लढलेल्या, परंतु नंतर बरीच वर्षे इस्रायल -पॅलेस्टाईन संघर्षात मूक साक्षीदार बनून राहिलेल्या अरब देशांमध्ये आणि इतरत्र पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांना तोंड फुटले आहे, हे अर्थातच इस्लामी कट्टरपंथीय शक्तींच्या पथ्थ्यावर पडू शकते. गेली अनेक वर्षे केवळ इस्रायल – पॅलेस्टाईन यांच्यापुरता सीमित राहिलेल्या ह्या विषयाला इस्रायल व त्याची समर्थक अमेरिका विरुद्ध समस्त इस्लामी जगत असे वळण मिळावे ही हमास काय किंवा इस्लामी जिहाद का यांची आकांक्षा आहे. सध्याच्या परिस्थितीत रशिया आणि चीनसारखे देश अमेरिकेला शह देण्यासाठी ह्या आकांक्षेला पडद्यामागून खतपाणी घालत आहेत. युक्रेनवर आक्रमण केलेल्या रशियाला शह देण्यासाठी ज्या प्रकारे अमेरिका त्या देशाच्या पाठीशी पडद्याआडून उभी आहे, तशीच रशियाची सध्या भूमिका राहिली आहे. गाझा प्रश्नी आपल्याला सहानुभूती मिळवण्यासाठी आणि त्याहून अधिक इस्रायल भेटीवर येणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे इस्रायलला अन्य अरब देशांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न तडीला जाऊ नयेत यासाठी इस्रायल म्हणते आहे त्याप्रमाणे इस्लामी जिहादकडूनही हा घातपात घडविलेला असू शकतो. परंतु गाझा – इस्रायल युद्धाची समीकरणे मात्र ह्या भीषण मृत्युकांडानंतर बदलली आहेत हे लक्षात घेणे जरूरी आहे. ज्या प्रकारे काल इस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बँकमध्ये उग्र निदर्शने झाली, ज्या प्रकारे ठिकठिकाणच्या इस्रायलच्या, अमेरिकेच्या दूतावासांना आंदोलक लक्ष्य करीत आहेत, ते पाहिल्यास हा विषय अधिकच चिघळत जाऊ शकतो. मात्र, अमेरिकेने ह्या दबावाला भीक घातली नसल्याचे कालच्या ज्यो बायडन – नेतन्याहू भेटीदरम्यान जेव्हा बायडन यांनी स्फोटामागे इस्रायल नसल्याचे सूचित केले, त्यावरून दिसून येते. परंतु पॅलेस्टाईनच्या विषयाला सध्याच्या घटनाक्रमांतून पुन्हा चालना मिळाली आहे आणि त्यात त्यांना कुठून किती आणि कसा पाठिंबा मिळत जातो, त्यावर ह्या चळवळीची आणि संघर्षाची पुढील दिशा ठरणार आहे. 2006 च्या निवडणुकांत गाझामध्ये तुलनेने मवाळ असलेल्या फताहला पराभूत करून कडवी हमास गाझात सत्तेवर आली. वेस्ट बँक म्हणजेच जॉर्डन नदीच्या पश्चिम काठावरील प्रदेशात स्वायत्त कारभार करणारी फताह आणि गाझामधील हमास ह्या दोन्हीही पॅलिस्टिनियनांचे प्रतिनिधित्व करीत असल्या, तरी आक्रमकतेच्या बाबतीत दोन्ही दोन टोके आहेत. 87 साली वेस्ट बँक आणि गाझावरील इस्रायलच्या कब्जावरून पहिला व्यापक उठाव किंवा विद्रोह, ज्याला अरबी भाषेत ‘इंतिफदा’ संबोधले जाते, तो झाला होता व त्याचे पडसाद 93 पर्यंत उमटत राहिले. 2000 ते 2005 ह्या काळात दुसऱ्यांदा पुन्हा उठाव झाला. आता गाझावरील इस्रायली आक्रमणातून तिसऱ्या ‘इंतिफदा’ला चालना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.