तिळारी प्रकल्पात बुडीत गेलेल्या शिरंगे गावात धरणाच्या पाणलोट क्षेत्रापासून अवघ्या ३० फूट अंतरावर शुक्रवारी उशीरा मानवी कवटी व हाडे सापडल्याने खळबळ उडाली असून ती नेमकी कुणाची याचा तपास लागू शकलेला नाही. परवा अंधार पडल्याने दोडामार्ग पोलिसांनी शनिवारी सकाळी पुन्हा आणखी हाडे सापडतात का, याचा शोध घेण्यासाठी परिसरात मोहीम हाती घेतली, त्यावेळी डाव्या पायाचे हाड व इतर हाडे सापडली. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस स्थानकातून श्वानपथक आणून शोध घेण्यात आला. तिळारी प्रकल्पात बुडीत गेलेल्या शिरंगे गावात धरणाच्या पाणलोट क्षेत्राबाहेर असलेल्या जमिनीतील झाडांची साफसफाई करण्यासाठी शुक्रवारी दीपक गवस हे गेले असता त्यांना झाडी तोडत असताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रापासून ३० फूट अंतरावर मानवी कवटी व हाडे आढळून आली. त्यांनी लगेच याची माहिती खानयाळे गावचे पोलीस पाटील देऊलकर यांना सायंकाळी दिल्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन हाडे ताब्यात घेतली. हाडे व कवटी सापडली त्या स्थळापासून काही अंतरावर चादर, बर्मुडा, हाफ पॅन्ट आढळून आली. मात्र कपडे वाळवी लागलेल्या अवस्थेत होते. अंधार असल्याने पोलिसांना जंगलातून परतावे लागले.
शनिवारी सकाळी पोलिसांनी पुन्हा शिरंगे गावात जावून शोध मोहीम सुरू केली असता डाव्या पायाचे हाड व अन्य काही हाडे सापडली. ती पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतली. या ठिकाणी जंगलात वन्य प्राण्यांनी हाडे इतरत्र टाकली का? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ओरोस येथून पवन श्वान पथकाला पाचारण केले होते. पण कुत्रा परिसरात घुटमळत राहिला. वाढलेल्या जंगलामुळे मानवी हाडे वन्य प्राण्यांनी दूरदूरवर नेल्याने या घनदाट जंगलात शोध घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे हे पथक दुपारी माघारी परतले.
शिरंगे गावात ज्या ठिकाणी ही मानवी हाडे सापडून आली ती जागा गेल्या ४ महिन्यांपासून तिळारी प्रकल्पाच्या पाल गावातून खानयाळे गावातील कामगार चंद्रकांत सावंत बेपत्ता झाला होता. या प्रकरणीही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याच्या नातेवाईकांना सापडलेले कपडे दाखविण्यात आले मात्र नाईवाईक खातरजमा करू शकले नाहीत. दरम्यान, मानवी हाडे व कवटी पुढील तपासासाठी मुंबई व मिरज येथील प्रयोगशाळेत तातडीने पाठवली जाणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.