>> जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकरांची माहिती; आराखड्यावर काम सुरू
>> मांडवी नदीतून जलवाहिनी टाकली जाणार; पाणीटंचाईपासून सुटका
गोवा व महाराष्ट्र यांचा आंतरराज्य प्रकल्प असलेल्या तिळारी धरणाचे पाणी पणजी शहरात आणण्यासाठी मांडवी नदीतून जलवाहिनी टाकली जाईल. पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती काल राज्याचे जलसंसाधनमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
जलसंसाधन खात्याने पणजीत तिळारी धरणाचे पाणी आणण्यासाठीचा आराखडाही तयार करण्याचे काम हाती घेतले असून, पुढील दोन वर्षांत मांडवी नदीत जलवाहिनी टाकून तिळारीचे पाणी पणजी शहरात आणण्यात येणार असल्याचे शिरोडकर म्हणाले.
सध्या तिळारी धरणाचे पाणी हे पर्वरीपर्यंत आणण्यात यश आलेले आहे. पर्वरीतील 15 एमएलडी जलुशुद्धीकरण प्रकल्प हा तिळारीच्या पाण्यावरच चालू आहे.
पणजी शहरातील मांडवी नदीमुळे हे पाणी पणजी शहरात आणता आलेले नाही; मात्र आता थेट नदीपात्रातून जलवाहिनी टाकून हे पाणी राजधानी पणजी शहरात आणण्याची योजना आखण्यात आलेली आहे.
या योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर पणजी शहराबरोबरच, ताळगाव, सांताक्रूझ, मेरशी, बांबोळी या आजूबाजूच्या सर्व भागांनाही तिळारी धरणातील पाण्याचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. परिणामी पणजी शहरांबरोबरच या अन्य उपनगरातील पाण्याची समस्याही सुटण्यास मदत होणार आहे.
पणजी शहरासह ताळगाव व अन्य भागांत नवनव्या निवासी इमारती आणि प्रकल्प वाढत चालले आहेत. पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती आजच्या घडीला आहे. तिळारीचे पाणी पणजीत आल्यानंतर पाणीटंचाईच्या समस्येवर बऱ्याच अंशी मात करता येणार आहे. जलस्रोतमंत्र्यांनी दोन वर्षांत पणजीत तिळारीचे पाणी जलवाहिन्यांचे काम पूर्ण केले जाईल, असे स्पष्ट केलेले असल्याने आता प्रत्यक्षात कधीपासून त्या कामाला सुरुरवात होते हे पाहावे लागणार आहे.
चिंबलमधील बेकायदा
कुपनलिका बुजवणार
चिंबल गावात तब्बल 60 ते 70 बेकायेदशीर कुपनलिका (बोअरवेल्स) असून त्या बंद केल्या जातील, अशी माहिती सुभाष शिरोडकर यांनी काल दिली. या कुपनलिकांची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत गेल्या शुक्रवारी काहीजणांना नोटिसाही बजावण्यात आल्या. अशा बेकायदेशीर कुपनलिका खोदणाऱ्यांना गोवा भूजल कायद्याखाली 10 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.