तिळारी घाटात टेंपो कलंडून भाजी विक्रेता जागीच ठार

0
225

तिळारी घाटात काल मध्यरात्री भाजीवाहू टेंपो कलंडून झालेल्या अपघातात दोडामार्ग येथील भाजीविक्रेते दुर्गाप्पा भिमाप्पा वडर (३२) यांचे जागीच निधन झाले तर ड्रायव्हर व त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाले. हा अपघात मध्यरात्री २.३० च्या सुमारास झाला. टेंपोचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत्यूचा सापळा बनलेल्या तिळारी घाटातून अवजड व धोकादायक वाहनांना प्रवेश बंदी आहे. शनिवारी रात्री बेळगाव येथे भाजी घेऊन एमएच – ०४ – डीएस – ३०४८ या क्रमांकाचा ट्रक तिळारी घाटमार्गे परत येत होता. सदर टेंपो यू आकाराच्या ‘जेकर पॉइंट’ या वळणावर पोचल्यावर टेंपोचा एक ब्रेक फेल झाला. यामुळे टेंपोचे पुढचे डावे चाक रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात गेल्याने तो कलंडत असताना भीतीने दुर्गाप्पाने गाडीचा दरवाजा उघडला. यावेळी चालक कल्लाप्पा पावसकर व साहाय्यक वैजनाथ गोपाळ तेवाळ या दोघांनी त्याला गाडीतून उडी न मारण्यास सांगितले. मात्र, त्याने गाडीतून उडी मारल्याने तो कलंडलेल्या टेंपोखाली सापडून जागीच ठार झाला. अपघातात चालक व साहाय्यक दोघेही बाहेर फेकले गेल्याने त्यांना किरकोळ मार बसला. टेंपोतील भाजी रस्त्यावर सर्वत्र विखुरल्याने सुमारे ४० ते ५० हजारांचे नुकसान झाले. अपघाताचा पंचनामा चंदगड पोलिसांनी केला असून टेंपो ड्रायव्हर रामकृष्ण याला ताब्यात घेतले आहे.

जेकर पॉइंट मृत्यूचा सापळा
तिळारी घाटातील जेकर पॉइंट येथे यापूर्वी अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. या वळणावर सुमारे ५०० मी. खोल दरी आहे. येथे शासकीय डंपर कोसळून ५ जण ठार झाले होते. बोअरवेलचे वाहन कोसळून दोघे प्राणास मुकले होते. या मार्गे खडीची वाहतूक होत असल्याने २ फूट रुंदीचे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.