तिळारी कालव्याच्या वार्षिक दुरुस्तीच्या कामामुळे या कालव्यातून गोव्याकडे पाणी कालपासून बंद करण्यात आल्याने पेडणे आणि बार्देश तालुक्यात मर्यादित पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग १७ (पीएचई-एन) च्या कार्यकारी अभियंत्यांना दिली.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अस्नोडा, पर्वरी आणि चांदेल येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून बार्देश आणि पेडणे तालुक्यात पाण्याचा पुरवठा केला जातो. या तिन्ही पाणी प्रकल्पांना तिळारी कालव्यातून आवश्यक पाणी उपलब्ध केले जाते. तिळारी कालवा दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने शुक्रवारपासून कालव्यातून पाणी सोडणे बंद करण्यात आले. तिळारी कालव्यातून पाणी पुन्हा सुरू होईपर्यंत अस्नोडा, पर्वरी आणि चांदेल येथील जलशुद्धीकरण प्रकल्पांना पाण्याचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे बार्देश आणि पेडणे तालुक्यात मर्यादित पाणीपुरवठा केला जाणार आहे.
नागरिकांना तीनही प्रकल्पांत उपलब्ध पाण्यानुसार पाण्याचा पुरवठा केला जाणार असून, दोन्ही तालुक्यातील अनेक भागात पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल केला जाऊ शकतो, असे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी तिळारी कालवा दुरुस्तीसाठी बंद ठेवला जाणार असल्याची शक्यता गुरूवारी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी जलस्रोत, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक घेऊन बार्देश आणि पेडणे तालुक्यात पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना हाती घेण्याची सूचना केली होती.