दोडामार्ग (न. प्र.)
तेरवण मेढे धरणाच्या उजव्या कालव्यातून घोटगेवाडी गावातील शेतकर्यांना पाणीपुरवठा करणार्या कालव्याच्या दुरूस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जातात. पण बागायतीला पाणी मिळत नाही. त्यामुळे काम न करता रकमेची उचल करणार्यांची, तशीच संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करून मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी घोटगेवाडी येथील शेतकरी तिळारी येथील कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत.
तेरवण मेढे धरणातून गेलेल्या उजव्या कालव्यातून घोटगेवाडी, घोटगे, तिळारी, भटवाडी, परमे, या गावांना पाणीपुरवठा केला जातो. या पाण्यावर शेकडो शेतकरी शेती करतात. ह्या कालव्यातून पाणी गळती सुरू झाल्याने बागायतीत पाणीपुरवठा होत नव्हता. शिवाय अनेक लोकांनी कालव्यासाठी जमीन देऊनदेखील त्यांना कालवा विभागाने नुकसानभरपाई दिली नाही, असा आरोप शेतकर्यांनी केला आहे. तसे निवेदन कार्यकारी अभियंता धाकतोडे चराठा सावंतवाडी यांना दिले आहे.
शेतकर्यांचा विचार नाही
धरणाचा कालवा असून शेतात पाणी मिळत नसल्याने हजारो रुपये पाईपसाठी खर्च करून पाणी आणावे लागते. बागायती, जमिनीपर्यंत पाणी यावे या मागणीचा अधिकारी विचार करत नाहीत. जलवाहिनी घालून पाणी देण्याचा सर्व्हे होऊन प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. याला जबाबदार कार्यकारी अंभियंते आहेत. त्यांच्याकडून केवळ आश्वासने दिली जातात. शेतकर्यांच्या मागण्यांचा विचारच केला जात नाही असे यावेळी शेतकर्यांनी सांगितले.
येथे कार्यालयात जबाबदार अधिकारी नाहीत. शेतकर्यांनी आपल्या समस्या कुणाकडे मांडाव्यात असा प्रश्न करत येथील बंद केलेले कार्यकारी अभियंता कार्यालय चालू करावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, सोमवारपासून सुरू केलेल्या या उपोषणाला उपोषण स्थळी सभापती संजना कोरगांवकर, जिल्हा पंचायत सदस्या अनिषा दळवी यांनी भेट देऊन शेतकर्यांना आपला पाठिंबा दिला.
अधिकार्यांवर प्रश्नांचा भडिमार
सोमवारी सायंकाळी दोडामार्ग तहसीलदार बिर्जे तसेच उपअंभियंता आजगेकर यांनी भेट दिली. यावेळी जोपर्यंत सक्षम अधिकारी या घोटाळ्यांची उत्तरे देणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी आजगेकर यांना सांगितले. उपोषणस्थळी चर्चा करताना येथे ठेकेदार येता कामा नयेत. येथे धरणे असताना आपत्ती व्यवस्थापन काय करत आहे असे आजगेकर यांना विचारताच ते निरुत्तर ठरले. सावंतवाडीत बसून तिळारीचा कारभार कसा चालतो? असे विविध सवाल प्रकल्प अधिकारी आजगेकर यांना विचारल्याने अखेर उपोषस्थळापासून आजगेकर यांनी काढता पाय घेतला.
तिळारी येथील उपोषणात संतोष दळवी, कमलेश परियेकर, अतुल कर्पे, भालचंद्र कुडव यांच्यासह अनेक शेतकरी महिला सहभागी झाल्या आहेत. या उपोषणात भाजपचे लक्ष्मण नाईक, रंगनाथ गवस, संजय सातार्डेकर, प्रवीण गवस, पराशर सावंत, गोपाळ गवस, रत्नकांत कर्पे व इतर सहभागी झाले आहेत.