तिळारीच्या कालव्यात कार कोसळून महिलेचा मृत्यू

0
5

साटेली-भेडशीतील भोमवाडीत गुरुवारी पहाटे 3 च्या सुमारास तिलारीच्या उजव्या कालव्यात कार कोसळून झालेल्या अपघातात शुभांगी शिवा परब (62, रा. वझरी-पेडणे) हिचा मृत्यू झाला. या अपघातात वाहन चालवणारा तिचा मुलगा किरकोळ जखमी झाला. दरम्यान, मुख्य मार्गालगत तिळारी धरणाचे कालवे गेले आहेत, त्या ठिकाणी संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडत आहेत, असा आरोप केला जात आहे. शुभांगी परब हिचा मुलगा हा गोवा पोलीस दलात कार्यरत आहे. त्याच्याविरुद्ध या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीनुसार, दोडामार्ग तालुक्यातील कुडासे वानोशी येथे माहेर असलेल्या आणि वझरी पेडणेतील रहिवासी असलेल्या शुभांगी शिवा परब यांचे पती कोल्हापूर येथे दवाखान्यात भरती असून, त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याने त्यांना आणण्यासाठी आई व मुलगा असे दोघेही कोल्हापूरला गेले होते. शुभांगी हिचे भाऊ दत्ता तळणकर यांची स्कॉर्पिओ कार (क्र. एमएच-07-एजी-6951) घेऊन बुधवारी सकाळी ते कोल्हापूर येथे गेले होते; पण वडिलांना डिस्चार्ज न मिळाल्याने ते रात्री उशिरा कोल्हापूर येथून घरी येण्यासाठी परत निघाले. रात्री कुडासे वानोशी येथे भावाच्या घरी आराम करून सकाळी नंतर वझरी पेडणे येथे जाण्याचा त्यांचा बेत होता. कोल्हापूर प्रवास करून ही स्कॉर्पिओ कार वानोशी कुडासे रस्त्यावर वळवली. त्यानंतर आणखी पंधरा मिनिटात ते घरी पोहोचणार होते. मुलगा सचिन परब याने आई का बोलत नाही म्हणून सहज मान मागे वळविली आणि आई झोपलीस का अशी विचारणा केली. आणि एवढ्यात तिळारी धरणाच्या उजव्या कालव्यात स्कॉर्पिओ कधी पडली हे कळलेच नाही. यानंतर सचिनने चांदण्याच्या प्रकाशात कसाबसा बाहेर पडून भोमवाडी येथील काही लोकांना आरडाओरडा करून जागे केले. यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. पहाटेच्या तीन वाजता ही घटना घडली.

ग्रामस्थांनी दोडामार्ग पोलिसांना या घटनेची माहिती दिली. प्रथम तिळारी कालव्याचा पाणीपुरवठा बंद करायला लावला. पाणी कमी झाल्यावर शुभांगी परब यांना बाहेर काढून साटेली भेडशी आरोग्य केंद्रात दाखल करेपर्यंत त्या बोलत होत्या. नंतर त्यांचा मृत्यू झाला. शुभांगी परब हिच्या पश्चात पती, दोन मुलगे व इतर परिवार आहे. तिचा मृतदेह साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे ठेवण्यात आला होता. या घटनेने वझरी पेडणे, तसेच कुडासे वानोशी गावात हळहळ व्यक्त होत आहे.