तिळारी कालव्याला दोडामार्गजवळ कुडासे येथे मोठे भगदाड पडल्याने काल उत्तर गोव्याचा पाणीपुरवठा बंद झाला. याचा परिणाम अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पावर होणार असून, कालवा दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्याने बार्देश व डिचोली तालुक्यांत पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होणार आहे. दोन्ही तालुक्यांतील जलसिंचनावरही मोठा परिणाम होणार आहे.
कालव्याला भगदाड पडल्याने काल लाखो लीटर पाणी वाया तर गेलेच, शिवाय हे पाणी शेती-बागायतींत शिरण्याबरोबरच रस्त्यावरही आल्याने गोंधळ उडाला. कुडासे येथे ज्या ठिकाणी हा कालवा फुटला आहे, ते भगदाड सुमारे 5 ते 6 मीटर एवढ्या लांबीचे आहे. कालव्याला पडलेले भगदाड भरून काढून कालव्याची दुरुस्ती करण्यास किमान आठवडाभराचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
गोव्याच्या जलसंसाधन खात्याने पर्यायी व्यवस्था म्हणून आमठाणे धरणातून पाणी ओढून घेऊन अस्नोडा प्रकल्पाला पुरवण्यासाठी पावले उचलली आहेत. तिळारी धरणाला भगदाड पडल्याने बार्देश व डिचोली तालुक्यांवर मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जाण्याची पाळी येणार आहे.
या सगळ्याचा मोठा फटका पर्वरी शहराला बसणार आहे. तिळारीतून सुमारे 500 एमएलडी जाण्याचा पुरवठा रोज गोव्याला होत असतो. त्यापैकी 100 एमएलडी पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी वापरले जाते. संपूर्ण बार्देश तालुका हा अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पावर अवलंबून असल्याने बार्देशवासीयांचे पुढील बरेच दिवस पाण्यासाठी हाल होण्याची शक्यता आहे.