तिथे शब्द न उरे!

0
3
  • प्रवीण गाडगीळ
    साखळी

फार वर्षांपूर्वीची कथा आहे. त्यावेळी रीतीभाती वेगळ्या होत्या. आजच्यासारख्या सुधारणा नव्हत्या. आपल्या नवविवाहित मुलीला पहिल्या दिवाळी सणासाठी बाप आणायला गेला. मुलीला घेऊन निघताना दिवाळी सणाला येण्याबद्दल जावईबापूंनाही अगत्यपूर्व व आग्रहाची विनंती केली. जावयानेही ती मान्य केली.

दिवाळी एक-दोन दिवसांवर आली आणि कबूल केल्याप्रमाणे जावईबापू चार-पाच मित्रांना घेऊन दिवाळी साजरी करायला सासरवाडीस आले. लग्न परगावी झालं असल्याकारणानं मुलीच्या मैत्रिणीही जमल्या होत्या. मैत्रिणीचा नवरा कौतुकाने पाहावा हा हेतू होता.
दिवाळीच्या दिवशी घरात खूप गर्दी होती. जावई आपल्या चार-पाच मित्रांच्या घोळक्यात फराळ करीत बाहेरच्या खोलीत बसले होते. हास्यविनोद सुरू होते. मोठे अन्नदान, मोठे आनंदाचे वातावरण होते. पण मुलीच्या मैत्रिणींना या घोळक्यातून नवरा मुलगा कोणता हे काही ओळखता येईना. मैत्रिणीला घेऊन मग त्या दारात उभ्या राहून विचारू लागल्या. पण ओळख असली तरी बोट दाखवून नवरा दाखवण्याची पद्धत त्यावेळी नव्हती. मग मैत्रिणीच तिला खुणेने विचारू लागल्या, हा आहे का? मग तो आहे का? प्रत्येक वेळी ती ‘नाही, नाही’ असं म्हणत होती. पण जेव्हा मैत्रिणीने नवऱ्याकडे खुणेने इशारा केला तेव्हा मात्र होकार न देता तिने फक्त लाजून खाली मान घातली, आणि हसतच माजघरात पळाली. पतीची पूर्ण ओळख असूनही त्याच्याबद्दल काही सांगताना मात्र तिने मौन पाळलं. ती निरुत्तर होऊन पळाली, होय पण म्हटलं नाही. परमात्म्याच्या बाबतीतही असंच होतं. परमात्मा आहे तिथे शब्दच उरत नाही.