तिघा सशस्त्र चोरट्यांना अटक

0
10

>> कुळे, अनमोड पोलिसांची कामगिरी

>> पाचपैकी दोघे संशयित निसटले

>> तपासणी नाक्यावर घेतले ताब्यात

>> तीन पिस्तुले व गोळ्या जप्त

गोव्यातील सोनाराच्या दुकानात दरोडा घालण्यासाठी आलेल्या चोरट्यांना जेरबंद करण्यात अनमोड व कुळे पोलिसांना यश आले. अनमोड पोलिसांनी दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्तूले तर 8 बुलेट जप्त केल्या आहे. त्याचप्रमाणे कुळे पोलिसांनी एका संशयिताला अटक करून एक पिस्तूल व 3 बुलेट जप्त केल्या आहे. तर अन्य 2 संशयित फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार गोव्यात मोठा दरोडा घालण्यासाठी 5 संशयितांनी रेल्वे मार्गाने शनिवारी मडगाव गाठले. परंतु सोनाराच्या दुकानात दरोडा घालण्याचा बेत चुकल्याने सर्व 5 संशयित बस मार्गाने हुबळी येथे जात होते. पण अनमोड तपासणी नाक्यावर शनिवारी दुपारी 3.30 वाजता सदर बसची तपासणी करीत असताना तीन संशयितांनी जंगलातून पळ काढला. तर गोवर्धन बाबू सिंग (29, राजस्थान) व श्यामलाल दीपरामजी मेगवाल (23, राजस्थान) यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन पिस्तूल व 8 बुलेट सापडल्या. यावेळी त्यांनी तीन संशयित पळून गेल्याचे सांगितले. कुळे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळे कुळे पोलिसांनी मोले तपासणी नाक्यावर कडक तपासणी केली. शनिवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लाडू कुका सिंग (22, राजस्थान) याला कुळे पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व 3 बुलेट जप्त करण्यात आल्या. या प्रकारणातील अन्य दोघे संशयित फरार असून अनमोड पोलीस व कुळे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अनमोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी सर्व पिस्तूल व बुलेट मध्यप्रदेशमधून खरेदी केल्या असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

फोंडा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक अर्शी आदिल व कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सगुण सावंत यांनी अनमोड येथे जाऊन तेथील पोलिसांकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी गोव्यातील मडगाव व फोंडा परिसरातील सोनारांच्या दुकानात दरोडा घालण्याचा प्रयत्नात संशययित होते. मात्र त्यांचा बेत फसल्याने ते बसने निघाले असल्याचे उघड झाले आहे.