१५ दिवसात डांबरीकरणाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
ताळगाव मतदारसंघातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी ताळगाव भाजपचे नेते दत्तप्रसाद नाईक यांनी आपल्या समर्थकांसह काल सकाळी सांतइनेज येथे रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आश्वासन जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम खाते देत नाही तोपर्यंत आपण रास्ता रोको मागे घेणार नसल्याची भूमिका दत्तप्रसाद नाईक यांनी घेतल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते सुनील रायकर व सहाय्यक अभियंते राजेंद्र नाईक घटनास्थळी गेले व १५ दिवसांच्या आत निविदा काढून रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याचे आश्वासन नाईक यांना दिले. त्यानंतर नाईक यांनी आंदोलन मागे घेतले.मात्र, दरम्यानच्या २ ते अडीच तासांच्या काळात रास्ता रोकोमुळे वाहतुकीची कोंडी झाली. पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांना फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
आपल्याच पक्षाचे सरकार सत्तेवर असताना दत्तप्रसाद नाईक यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे काल दत्तप्रसाद नाईक यांना टीकेलाही सामोरे जावे लागले.
काल सकाळी ८.३० वा. सुरू झालेले हे रास्ता रोको आंदोलन ११ वाजेपर्यंत चालू होते. नंतर साबांखाच्या अभियंत्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.