ताळगाव येथील मलनिःस्सारण प्रकल्प व रस्त्याच्या कामाची चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले. ताळगांवच्या आमदार जेनिफर मोन्सेर्रात यांनी याबसंधीचा प्रश्न विचारून साबांखा मंत्री सुदीन ढवळीकर यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.
ताळगांव येथे १०० कोटी रुपयांचा मलनिःस्सारण प्रकल्पाचे काम चालू आहे. तेथील रस्त्यांचे खोदकाम केल्यानंतर त्याचे डांबरीकरण करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असल्याचे सांगून डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन ढवळीकर यांनी दिले.
डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणे शक्यच नाही, असे जेनिफर यांचे म्हणणे होते. वरील कामामुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालविणे कठीण होते, असे त्यांनी सांगताच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हस्तक्षेप केला. जेनिफर यांच्या व आपल्या या विषयावरील भावना एकच आहेत. आपल्याला त्रास होतो म्हणून आपण हस्तक्षेप करतो, असे जनेतला वाटू नये म्हणून आपण गप्प होतो. परंतु जेनफिर यांनी प्रश्न उपस्थित केल्याने हस्तक्षेप करावाच लागला, असे पर्रीकर यांनी सांगितले. ढवळीकर यांच्याकडील साबांखा खाते काढून घ्या व कला आणि संस्कृती खाते त्यांच्याकडे सोपवा ते चांगले काम करतील, असे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांनी सांगितले. त्यावर तो मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे, असे पर्रीकर म्हणाले. मोन्सेर्रात यांच्या या विधानामुळे ढवळीकर यांचा पारा चढला. परंतु सभापतींनी हे प्रकरण अत्यंत कुशलरीत्या हाताळले. त्यामुळे सभागृहातील वातावरण अधिक गरम झाले नाही. ताळगाव हा रेतीचा भाग आहे. पाणी जवळ आहे तीन ते साडेतीन मीटर खोदल्यास पाणी मिळते. त्यामुळे या भागातील मोठे खड्डे बुजविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागतो, असे ढवळीकर यांनी सांगितले.आदिवासींना ८ हजार घरे तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १० पूर्व प्राथमिक विद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. काणकोण येथे या विद्यार्थ्यांसाठी आश्रम स्कूल उभारण्यात येत आहे. आदिवासी समाजातील ५०० गुणवंत विद्यार्थ्यांना या विद्यालयाचा लाभ मिळणार आहे. ज्या गावात आदिवासींचे प्रमाण ३० टक्के आहे तेथेच त्यांच्यासाठी सांस्कृतिक भवने उभारण्यात येणार आहेत. गेल्या २ वर्षांत आपल्या खात्याने आदिवासींच्या २० योजनांची अमलबजावणी करण्यात आल्याचे तवडकर यांनी स्पष्ट केले.