तारक मेहता यांचे निधन

0
103

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेचे मूळ गुजराती लेखक तारक मेहता यांचे काल वयाच्या ८७ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. ‘दुनिया ने उंढा चष्मा’ या नावाचा त्यांचा मूळ गुजराती स्तंभ प्रचंड लोकप्रिय ठरला होता. स्तंभलेखन, नाट्यलेखनही त्यांनी केले होते. गुजराती रंगभूमीवरही ते लोकप्रिय होते.

सन २००८ साली सब टीव्हीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सुरू केली, तेव्हा तारक मेहता यांच्या सदर गुजराती स्तंभातील कथा दृश्यरूपात आणल्या होत्या. तो कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय ठरला. ही मालिका अजूनही सुरू असून अलीकडेच स्वच्छ भारत अभियान जारी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मालिकेलाही आपले स्वच्छता दूत बनविले होते.
पंतप्रधानांकडून शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध स्तंभलेखक आणि नाटककार तारक मेहता यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, प्रसिद्ध नाटककार तथा हास्यलेखक तारक मेहता यांनी, आयुष्यभर व्यंग आणि लेखणीची साथ सोडली नाही. मला तारक मेहताजी यांना भेटण्याची अनेकवेळा संधी मिळाली. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले, तेव्हाही मी त्यांना भेटलो होतो असे मोदी यांनी म्हटले आहे.