तामिळनाडूत पोलिसांच्या गोळीबारात ९ निदर्शक ठार

0
140

येथील वेदांता कंपनीच्या स्टरलाईट कॉपर कारखान्याविरोधात गेल्या काही महिन्यापासूनच्या चळवळीनंतर काल या प्रकल्पाविरोधकांच्या प्रचंड मोर्चावेळी मोठा हिंसाचार माजला. हिंसक आंदोलकांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९ लोक ठार झाल्याचे वृत्त आहे. राज्याचे मुख्यमंत्री इ. के. पलानीस्वामी यांनी या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन तसेच अन्य विरोधी पक्षानी पोलिसी कारवाईचा निषेध केला आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पोलिसी गोळीबाराचा निषेध केला.

दरम्यान ठार झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रु. व जखमींना प्रत्येकी ३ लाख रु.ची मदतही पलानीस्वामी यांनी जाहीर केली आहे.
तुतिकोरिन परिसरातील भूजल स्रोत सदर प्रकल्पामुळे प्रदुषित होत असल्याचा लोकांचा दावा असून हा प्रकल्प बंद करावा यासाठी लोकांनी गेल्या काही महिन्यांपासून चळवळ उभारली आहे. काल हजारो निदर्शकांनी तुतिकोरीन येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता. मात्र तेथून त्यांना स्टरलाईट कॉपर प्रकल्पाकडे मोर्चा नेऊ देण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे निदर्शक तेथील एका चर्चजवळ जमा झाले. तेथे जमावाला रोखताना पोलीस व निदर्शक यांच्यात प्रथम धक्काबुक्की व झटापटी झाल्या. पोलिसांनी बळाचा वापर केल्याने खवळलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यावर नियंत्रणासाठी पोलिसांनी लाठीमाराबरोबरच अश्रधुराचाही निदर्शकांवर मारा केला.

दगडफेकीत पोलीसही जखमी झाले. त्यानंतर निदर्शकांनी सरकारी वाहनांची नासधूस केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला असे सांगण्यात आले. दरम्यान तामिळनाडूंचे मच्छिमारी मंत्री डी. जयकुमार यांनी पोलिसी गोळीबाराचे समर्थन करताना त्यासाठी पोलिसांचा नाईलाज झाल्याचे सांगितले. निदर्शकांच्या भावना योग्य असल्या तरी हिंसाचार खपवून घेणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, कालच्या मोर्चाचे नेतृत्व केलेले एमडीएमके पक्षाचे संस्थापक वायको यांनी पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या बळाच्या वापराचा तीव्र निषेध केला. अन्य विरोधी पक्ष पट्टली मक्कळ कच्ची, डीएमडीके, एमएनएम यांनी पोलीसी कारवाईचा निषेध केला.
कालच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी काल तुतिकोरीनमधील आस्थापने मोठ्या प्रमाणात बंद ठेवण्यात आली. हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर सदर भागात ३ हजार पोलिसांसह १३ पोलीस उपअधीक्षकांना तैनात करण्यात आले आहे.