तामसुली-खांडोळा, माशेल येथे काल (मंगळवारी) दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंगला फोडून रोख व दागिने मिळून एकूण १३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला व ही धाडसी चोरी केली.
खांडोळा येथे विनायक नाईक यांच्या बंगल्यात ही चोरी झाली असून, या प्रकरणी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बंगल्यात विनायक नाईक तळमजल्यावर पत्नीसह तर बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा पूत्र वैभव नाईक व सून राहतात. काल सकाळी विनायक नाईक यांच्या पत्नी तसेच मुलगा व सून तिघेही कामाला गेल्यानंतर विनायक नाईक हे बाजारात गेले होते. दुपारी ते घरी परतल्यानंतर स्वयंपाकघराच्या खिडकीचे गज कापल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी तळमजला व पहिल्या मजल्यावरील दोन्ही कपाटे फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम मिळून एकूण तेरा लाखांचा ऐवज लंपास केला.
या चोरी प्रकरणी फोंडा पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी श्वान पथकाला व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. पण, चोरट्यांचा काही सुगावा लागू शकला नाही. बंगल्यात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी आधीच निकामी केल्याने त्यांचा माग लागू शकला नाही.
चोरी करण्यापूर्वीच चोरट्यांनी या बंगल्याची पाहणी केली असावी तसेच सीसीटीव्ही कॅमेराही निकामी करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने हे चोरटे सराईत असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फोंडा पोलीस करीत आहेत.