>> काल ३७.४ डिग्री सेल्सिअस नोंद
राज्यात काल तापमान प्रचंड वाढल्याने लोकांना उष्णतेचा कधी नव्हे एवढा त्रास सहन करावा लागला. काल राज्यात ३७.४ डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. सामान्य तापमानापेक्षा हे तापमान ५.१ डिग्री सेल्सिअस एवढे जास्त असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
राजधानी पणजी शहरात काल ३७.४ डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. पणजी शहरात आतापर्यंत नोंद झालेले सर्वांत जास्त तापमान हे ३९ डिग्री सेल्सिअस एवढे असून ते १२ मार्च १९७९ ह्या दिवशी नोंद झाले होते. दरम्यान, काल नोंद झालेले ३७.४ डिग्री सेल्सिअस हे पणजी शहरात मार्च महिन्यात नोंद झालेले १४ वे सर्वांत जास्त तापमान असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
पुढील काही दिवसांत राज्यात कमाल तापमान हे सामान्य तापमानापेक्षा ३-४ डिग्री सेल्सिअस जास्त राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुढील २४ तासांतही हा उष्मा कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. पूर्वेकडून वाहणारे वारे वातावरणाच्या खालच्या स्तरावरील उष्ण तापमान यामुळे हा उष्मा वाढल्याचे हवामान खात्याने म्हटले
आहे.