सांतईनेज येथील ताडमाड या रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी गोवा सरकार न्यायालयाकडून अतिरिक्त अवधीची मागणी करणार आहे. हे काम मे महिन्याच्या शेवटीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी काल सांगितले. महत्त्वाच्या अशा 12 मीटरच्या सांडपाणी वाहिनीचे काम शिल्लक राहिलेले आहे. त्याच बाजूने असलेली सांडपाणी वाहिनी व गॅस पाईपलाईनची तोडफोड होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. हे काम अत्यंत नाजूक स्वरूपाचे आहे, असे पांगम म्हणाले. अन्य सर्व रस्ते व सांडपाणी प्रकल्पांचे काम पूर्ण झालेले आहे, त्याची कल्पना सरकारने न्यायालयाला दिलेली आहे. फक्त तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणची छोटी-मोठी कामे तेवढी शिल्लक राहिली असल्याचेही ते म्हणाले.