भारत आणि चीन दरम्यान गलवानमधील धुमश्चक्रीनंतर उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट लेहजवळच्या नीमू लष्करी तळावर जाऊन आपले नेतृत्व हे पिछाडीवरून नव्हे, तर आघाडीवरून लढणारे आहे हे जगाला दाखवून दिले आहे. लेह – लडाखमध्ये अत्यंत प्रतिकूल हवामानामध्ये आणि खडतर परिस्थितीमध्ये भारतीय सीमांच्या संरक्षणार्थ सदैव सिद्ध असणार्या आपल्या लष्करी जवानांचे मनोधैर्य प्रचंड उंचावणारी ही पंतप्रधानांची भेट आहे यात शंका नाही. वास्तविक आघाडीवरील लष्करी तळांना संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे भेट देतील असे ठरले होते, परंतु ती भेट रद्द करण्यात आली तेव्हा काहीजणांच्या भुवया उंचावल्या होत्या, परंतु त्यामागील खरे कारण कालच्या पंतप्रधानांच्या आकस्मिक लेह भेटीतून समोर आले आहे. स्वतः पंतप्रधानांनी आघाडीवरील लष्करी तळाला थेट भेट देण्याची ही एक अपूर्व व ऐतिहासिक घटना आहे. एखाद्या पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने सीमावर्ती भागात गेले असता अशी भेट देणे वेगळे आणि केवळ आघाडीवरील सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी थेट सीमा गाठणे वेगळे. भारत आपल्या सार्वभौमत्वाप्रती कधीही तडजोड करणार नाही असा एक अत्यंत खणखणीत असा संदेश पंतप्रधानांच्या या भेटीने सीमेवर आगळीक करणार्या चीनला दिलेला आहे.
पंतप्रधानांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासमवेत काल ज्या नीमूला भेट दिली तेथून गलवानची सीमा अवघी २७० किलोमीटरवर आहे. गलवान चकमकीत शहीद झालेल्या १४ व्या कोअरच्या अधिकार्यांकडून त्यांनी त्या सीमेचा नकाशा समजावून घेतानाची दृष्ये बोलकी आहेत. सीमेवर तणाव असताना पंतप्रधानांसारखा देशाचा सर्वोच्च नेता आघाडीवरील लष्करी तळाला भेट देतो यातून प्रत्यक्ष सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना मिळणार असलेली ऊर्जा कल्पनातीत असेल. गलवानच्या चकमकीत जखमी झालेल्या जवानांची भेट घेऊन विचारपूस करण्यासही पंतप्रधान विसरले नाहीत. या सगळ्यातून एक स्पष्ट संदेश जातो तो म्हणजे लष्कराच्या पाठीशी राजकीय नेतृत्व ठामपणे आणि खांद्याला खांदा लावून उभे आहे.
गलवानमधील धुमश्चक्रीत चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी आपल्या जवानांना अत्यंत हिंस्त्रपणे ठार मारले. त्या घटनेच्या जखमा सहजासहजी बुजणार्या नाहीत हेच पंतप्रधानांची ही भेट सूचित करते आहे. भारतातील मोबाईलवरील चिनी ऍप्सवर बंदी घालून भारताने पहिले प्रत्युत्तर एका सर्वस्वी वेगळ्या डिजिटल रणभूमीवर दिले आहे. आयात होणार्या चिनी उत्पादनांची अत्यंत काटेकोर सीमाशुल्क तपासणी करण्याचे आदेशही सरकारने दिलेले आहेत. चिनी कंपन्यांना भारतीय कंत्राटांमधून हद्दपार करण्याचीही पावले विविध शासकीय यंत्रणांकडून उचलली जात आहेत. अनेक परींनी चीनला बसत असलेले हे एकामागून एक हादरे संपूर्ण भारत एक आहे आणि आपल्या एखाद्या अवयवाला जरी जखम झाली, तरी त्याची वेदना संपूर्ण देहामध्ये झिरपत गेलेली असते याची जाणीव नक्कीच करून देईल. सीमेवरील जवानांनी आपले रक्त सांडायचे आणि इकडे चिनी गुंतवणुकीकडे आपण आशाळभूत नजरा लावायच्या आणि चीनशी व्यवहार करून आर्थिक फायदे उपटायचे असे होऊ शकत नाही. आपल्या रक्षणासाठी सीमेवर सज्ज असलेले जवान हे आपलेच भाईबंद आहेत आणि त्यांच्या जिवाशी खेळ मांडाल, तर भले आमचा आर्थिक तोटा होणार असला तरीही आम्हीही तुमच्याशी व्यवहार करू शकत नाही ही राष्ट्रीय वृत्ती दिसण्याची आज गरज आहे.
गलवानमधील हिंसक चकमकीनंतर उभय देशांच्या लष्करी अधिकार्यांमध्ये तणाव निवळण्यासाठी औपचारिक बैठकांचे सत्र सुरू आहे. चीनने माघारीचे सूतोवाच देखील त्यात केले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र चीन तीळमात्र मागे हटलेला नाही. उलट गलवानपासून दूर पँगॉंग सरोवराच्या फिंगर फोर सुळक्यावर त्याने कब्जा केला आहे. भारताला खिजवण्यासाठी अवकाशातील उपग्रहांनाही दिसेल असा भलामोठा चीनचा नकाशा तेथील जमिनीत कोरून चीनने आपली लढण्याची खुमखुमी दाखवली आहे. अशा उचापतखोर राष्ट्रापुढे आपण मुकाट नमते घेणार नाही, ठोशाला ठोसा मिळेल हा संदेश पंतप्रधानांची ही भेट देते आहे.
भारत चीनच्या सततच्या कुरापतींचा केवळ मूक साक्षीदार होऊन राहिलेला नाही. आपल्या डिफेन्स ऍक्विझिशन कौन्सिलने नुकतीच आघाडीवर लढण्यासाठी आवश्यक असलेली विमाने, क्षेपणास्त्रे आदींच्या तब्बल ३९ हजार कोटींच्या खरेदीला मान्यता दिली आहे. २१ मिग – २९ विमाने, १२ सुखोई – ३० विमाने, ‘ऍस्ट्रा’ सारखी हवेतून हवेत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे यांचा त्यात समावेश आहे. चीनला १९६२ ची पुनरावृत्ती करू द्यायची नाही हा निर्धारच त्यातून व्यक्त होतो आहे.
भारत हा नेहमीच एक शांतीप्रिय देश राहिला आहे. परंतु जेव्हा गरज भासेल तेव्हा ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे’ हा आपल्या संतपरंपरेने दिलेला संदेश अनुसरण्यास तो कधीही मागे हटलेला नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारत हा तर राष्ट्रीय अस्मितेच्या बाबतीत अधिक सजग, जागरूक देश आहे. देशाचा अपमान हे सरकार सहन करणार नाही, शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही हा विश्वास मोदींच्या आजवरच्या कारकिर्दीतून जनतेमध्ये जागलेला आहे. त्यांची प्रस्तुत भेट ही सांकेतिक खरी, परंतु उद्या वेळ आली तर चीनच्या डोळ्याला डोळा भिडवण्याचा आणि ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याचा जो दृढ निर्धारही या भेटीतून व्यक्त होतो आहे, आघाडीवर लढणार्या सैन्यदलांना जे भक्कम राजकीय पाठबळ व्यक्त होते आहे, गलवानचे बलिदान व्यर्थ गेलेले नाही आणि जाणार नाही हा जो इशारा सूचित होतो आहे, त्या सगळ्यातून आजचा भारत हा ताठ कण्याचा भारत आहे हा संदेशच वाकड्या नजरेने पाहणार्यांना दिला गेला आहे.