>> भाजप पक्षाध्यक्षांनी केली मध्यस्थी
भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून सभापती पदापर्यंत पोचलेले रमेश तवडकर आणि पैंगीणच्या जिल्हा पंचायत सदस्या शोभना वेळीप यांच्यातील वाक्युद्ध संपुष्टात आणायला गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष आणि विद्यमान राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांना यश आले आहे.
मागील पंधरा दिवसांपासून सभापती तवडकर आणि शोभना वेळीप यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू होते. त्याची अखेर पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली. काल दि. 22 रोजी पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी खास बैठक बोलावून सभापती तवडकर आणि जि.पं. सदस्या वेळीप यांची बाजून ऐकून घेतली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, सचिव सर्वानंद भगत, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या सदस्या सुवर्णा तेंडुलकर, उपाध्यक्ष खुशाली वेळीप उपस्थित होते. हे प्रकरण अधिक ताणून ठेवल्यास पक्षाच्या संघटनशक्तीला बाधा येऊ शकते याचा विचार पक्षश्रेष्ठींनी केला.
या बैठकीने आपण समाधानी झालेले असून यापुढे आपण स्वतः आणि सभापती तवडकर काणकोण मतदारसंघात संयुक्तिकपणे काम करू असे वेळीप यांनी सांगून आमच्यातील वाद आता संपुष्टात आला असल्याची ग्वाही दिली.