तल्लख बुद्धीला योग्य दिशा द्यावी

0
169
  •  नीना नाईक

जास्त एनर्जी असलेल्या मुलांना शिक्षणाबरोबर इतर अनेक ठिकाणात गुंतवून ठेवले तर त्यांच्या बुद्धीला पैलू छान पडतील. स्थिर बसण्यासाठी बुद्धीबळ खेळणे किंवा खेळवणे हाही प्रकार अशा मुलांवर चालतो. हळूहळू ती थंड होतात. डोक्याचा वापर इतरत्र करायला धजत नाहीत.

कुरियरवाल्याचा फोन आला, घर सापडत नाही म्हणाला. मी त्याला सविस्तर पत्ता सांगितला. वळण समजल्यावर तो पाच मिनिटात घरी पोहोचला. दरवाजा उघडला. समोरचा मुलगा पाहून पटकन ओळखीचा चेहरा गोरामोरा झाला. ‘लिंबू’ मलाही नाव झटकन् आठवलं. खट्याळ, व्रात्य ‘लिंबू’ वर्गात सर्वांना हवाहवासा वाटे. त्याची अखंड पारायण असल्यागत बडबड भावे मुलांना तर शिक्षकांना तो शिकवू देत नाही याचा राग येई. त्याच्या ‘लिंबू’ नावाचे रहस्य मी त्यालाच एकदा विचारले. त्याने लगेच उत्तर दिले, ‘मी लहान असताना सर्वांच्यात खेळायचो. मला विशेष करून मोठ्या मुलांमध्ये खेळायला आवडायचे. याचमुळे आणि माझी शारीरिक यष्टी पाहून ती नेहमीच लिंबूटिंबू म्हणत. आता मी मोठा झालो तरी ‘टिंब’ गायब झाला, राहिलो ‘लिंबू’. आता राहिलं नाव अजरामर’’. त्याची ती झलक पाहून हसायला आलं.

‘लिंबू’ वर्गात असला की वर्ग भरल्यागत वाटे. त्याचे प्रश्‍न भन्नाट असत. ‘अटेंशन सीकर’ मुलांच्या कॅटेगरीतील तो होता. त्याच्याकडे पाहून शिकवले की तो शांत असे. शिक्षिका रागावल्या की तो कुठलीही पायरी ओलांडे, असे प्रसंग त्याने अनेकदा आणले. एकदा चक्क शिक्षक रागावल्यावर त्याने आत्महत्येची चिट्ठी लिहिली. आमची शाळा तिसर्‍या मजल्यावर होती. तिथून त्याने थेट गच्चीवरून चढून पाण्याच्या टाकीवर जाऊन स्थानापन्न झाला. शिकवायलाच देत नाही म्हणून शिक्षकाने त्याला वर्गाबाहेर न जाता ऑफिसमध्ये जाऊन बस सांगितले. ह्यातच त्याचा पापड मोडला. त्याची मनधरणी केली पण तो ठामपणे तिथेच बसला. शेवटी ‘फायर ब्रिगेड’ मागवायची पाळी आली. वरातीमोगून घोडे पोलीसही आले. खाली जाळी टाकली. वरून लिंबूने उडी मारली तर त्याचे प्राण वाचवावेत हा उद्देश. सर्व फिल्डिंग लागली. लिंबू कुणालाच घाबरत नाही हे आम्हालाही ठाऊक होते. कधी पोलिसांची धमकी दिली की तो नेहमी म्हणे ‘ते माझ्या खिशात आहे’.

असा हा ‘लिंबू’ स्वस्थपणे वरती जाऊन बसलेला. त्यालाही खाली काय गोंधळ झाला ही कल्पना नव्हती. तो आपल्या राज्यात होता. आमचा बागुलबुवा झाला होता. फायरब्रिगेडवाल्यांनी सर्व युक्त्या लढवल्या आणि लिंबूपर्यंत पोचले. त्याला खाली आणला. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला. लिंबूची बोलती बंद. शरण आलेला लिंबू सर्वांना गयावया करत होता. पाया पडत होता. आता आपल्याला पोलिस कस्टडीत घेऊन जाणार याचे भय त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते. वयाने तो त्यावेळी १५ वर्षांचा होता. आमचा जीव भांड्यात पडला आणि सर्व आपापल्या घरी पोहोचले.

लिंबूच्या आठवणी काढल्या की एकांतातही हसू फुटते. वर्गात त्याला शिक्षकांनी काही विचारले की तो स्वतःला मनोहर पर्रीकरांचा खास माणूस म्हणायचा. तसेच ते माझ्यासाठी आदर्श आहेत. मी मोठेपणी मनोहर पर्रीकर होणार असे वारंवार सांगे. शिक्षिकांना बेजार करत असे., याला अद्दल घडवावी म्हणून त्यावर्षी मी श्री. मनोहर पर्रीकरांना आमंत्रण दिले की एकदा आमच्या शाळेला भेट द्या. ते गाजावाजा न करता आले. मुलांना अचानक ते आल्याने क्षणभर काही सुचले नाही. लिंबूच्या वर्गात त्यांना नेले. लिंबू भारावून गेला. तो त्या दिवशी आणि त्यांच्यासमोर काहीच बोलू शकला नाही. मीही डिवचले नाही. त्यानंतर मात्र कधीही आपला वशिला पर्रीकरांच्या दरबारात कसा चालतो याचा उच्चार केला नाही.

‘टिचर्स डे’ साजरा करायचे फॅड मुलांना बेचैन करत होते. टिचर्स डे साजरा करायचा म्हणून मुलांनीच केक आणला. आम्हा सर्वांना बोलावले. खाऊ घातला. आम्हीही त्याच्यासाठी भरपूर खाऊ आणला होता. काहींनी गुलाब आणले होते. काहींनी ग्रिटींग आणली होती. काही मुलांनी ‘वेस्ट मे बेस्ट’ म्हणून प्रतिकृती सादर केली होती आणि शाळेला भेट दिली होती. लिंबूने मात्र मला मोठ्ठं चित्र दिलं- वाघ डरकाळी फोडतो- हे चित्र. मला खुदकन् हसायला आले. त्याच्या कल्पनाशक्तीची मजा नाही वाटली. सार्थ अभिमान वाटला. त्याने आपलं स्पष्टीकरण माझ्यासमोर मांडले, ‘‘मॅडम, कुठल्याही आणि कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही पहाडासारख्या उभ्या असता. सामोर्‍या जाता. भले आम्ही केलेली मस्ती, त्यातून उद्भवलेली भांडणे असोत, तुम्ही आमची बाजू मांडताना अनेकवेळा आमची आई झालात. घरी आईला भीत नाही. तुमच्या नुसत्या ओरडण्याने, काहीवेळा मिळालेल्या सहानुभुतीने आम्ही पंखाखाली असल्याची जाणीव होते’’. असा लिंबू.. त्याला रागवावंसं वाटलं तरी त्याच्याकडे खुबी होती की समोरच्याचा राग निवळून टाकण्याची!!
आमच्याकडे परप्रांतिय शिक्षक होती. ती इंग्रजी शिकवायची. साऊथ इंडियन असल्याने तिचे उच्चार स्पष्ट असले तरी मुलांना ऐकताना गंमतीशीर वाटायचे. अशावेळी लिंबू मुद्दाम तिच्याशी कोकणीत बोलायचा.. तेही हेल काढून. ती त्याला सांगून थकत असे, ‘‘टॉक इन इंग्लिश’’. हा एकच रट लावायचा. ‘‘माझी भास कोंकणी’’. तिला तो शिकवायलाच देत नसे. तिला नेहमी काळजी वाटे हा इंग्रजीत पास होईल की नाही! प्रिलिम्सला त्याने पेपर दिला. हा फायनलचा पेपर असल्यागत होते. रिझल्टसाठी तो आला नाही. तो सर्व तुकड्यातून प्रथम आला होता.

लिंबू अन्यायही सहन करत नसे. एकदा समोरच्या की आजुबाजूच्या शाळेच्या समोेर जाऊन उभा राहिला आणि त्याने पाहिले की शिक्षक गाडीतून उतरली व तिने तिची बॅग विद्यार्थ्यांकडे दिली. तडक महाशय त्या शिक्षिकेकडे गेले. स्पष्टवक्तेपणा अंगात मुरलेला. त्याने बेधडकपणे शिक्षिकेला फैलावर धरले. ‘‘तुम्हाला पगार मिळतो तो स्वतःच्या बॅगा उचलायचा. विद्यार्थी तुमचे नोकर नाहीत. त्यांच्याही बॅगा जड असतात. वयाच्या मानाने तुम्हीच त्यांची बॅग उचलली पाहिजे. झेपत नाही उचलायला तर हलकी बॅग आणा’’. त्या शिक्षिकेच्या मुस्काटात मारल्यासारखे झाले असेल. फाटक्या तोंडाचा म्हणे आम्ही. तरी तो समाजसुधारक होणार असंच मला वाटायचं. आज त्याला पाहून निराशा झाली. त्यानेही स्वतःला सावरले आणि म्हणाला, ‘‘मॅडम, मी ग्रॅज्युएशन संपवलं. आता मी सायकॉलॉजीत एम.ए. करण्याचा विचार करतोय. माझ्या मित्राला मी मदत करत होतो. थट्टेच्या सुरात मी त्याला विचारले, ‘‘काय, मग काय होणार आता तू?’’ ‘‘अजून विचार केला नाही. बहुदा शिक्षक होईन. मला कायम चिरतरुण असल्यागत वाटेल. माझी मस्ती आठवेल. मी मुलांना वठणीवर आणू शकतो, हा माझा विश्‍वास आहे’’. वार्‍याच्या झोक्यागत तो झाला आणि झटकन् पळाला.

लिंबूसारखी जास्त एनर्जी असलेल्या मुलांना शिक्षणाबरोबर इतर अनेक ठिकाणात गुंतवून ठेवले तर त्यांच्या बुद्धीला पैलू छान पडतील. स्थिर बसण्यासाठी बुद्धीबळ खेळणे किंवा खेळवणे हाही प्रकार अशा मुलांवर चालतो. हळूहळू ती थंड होतात. डोक्याचा वापर इतरत्र करायला धजत नाहीत. कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांच्या कलाप्रमाणे घेतली की ते खूप चमकून जातात. पालक ‘मुलं मस्ती करतात’ ह्या वाक्यात अडकलेली आढळतात. वेळीच त्यांना कौन्सिलिंग झाले की मुलांना वळण वेगळेच लागते. तल्लख बुद्धीला योग्य दिशा देणे शिक्षक व पालकांच्या हातात असते. टायमिंग महत्त्वाचे असते हे निश्‍चित!