– सौ. पौर्णिमा केरकर
मरुभूमी राजस्थान विषयीचे आकर्षण मनात अगदी नकळतपणे रुजत होते. दर्या संगमावरील लोकोत्सवात हे राजस्थानी संगीत जीवाला अगदी वेडच लावत असे. ‘निमुडा निमुडाऽऽ’ करत फेर धरून तनामनात वेगळी धुंदी चढविणार्या राजस्थानमधील उदयपूर शहराला भेट द्यायलाच हवी हा विचारसुद्धा पक्काच झाला. राजस्थानी संगीत, वेशभूषा, नृत्य, लोककला, इतिहास, संस्कृती सारेच विलोभनीय, स्वत:च्या वैविध्यपूर्णतेचा वेगळा ठसा उमटविणारे. आपल्या देशातील संघराज्यांचा विचार करता संघराज्यातील एक मोठे राज्य असेच ज्याला म्हणावे लागेल अशा या प्रदेशाला राजपूत लोकांचा व राजांचा प्रदेश असेच संबोधले जायचे. ह्या प्रदेशाला भव्यदिव्य इतिहास संस्कृतीची पार्श्वभूमी आहे, तसेच रक्तरंजित लढायांची किनार लाभलेली आहे. वातावरण, भौगोलिक परिसर या सर्व बाबतीत राजस्थानचे स्वत:चे असे अप्रुप आहे. राजस्थानचा प्रवास केला आणि एकाच टप्प्यात सर्व जागा पाहून झाल्या असे मुळी होणेच शक्य नाही. तसे ते कोणत्याच प्रदेशाविषयी शक्य होत नसते. त्यामुळेच सुरूवातीलाच वाळवंटी भागात न जाता, गुलाबी शहर जयपूरला मागे सारून, राजे-राजवाड्यांचे, राजेशाही थाटाचे अनुभव घ्यायचे व इथल्या मातीतल्या लोकसंगीतालाही तेवढेच स्वत:त सामावून घ्यायचे, कठपुतळ्यांची कला अनुभवायची, नाथद्वार सिटी पॅलेस, हल्दीघाट, चित्तोडगड व या सार्याला व्यापून राहिलेली मीरेची भक्ती उमजून घ्यायची म्हणून तलावांचे शहर उदयपूरचाच विचार मनात आला. फतेह सागर, उदय सागर, स्वरूपसागर सारखे तलाव सौंदर्यपूर्ण आहेत.राजस्थानातील हवामानाचा विचार करता नोव्हेंबर महिनाच ठरवला तर ते संयुक्तिक ठरते. उन्हाळ्यात वैशाख वणवा तर हिवाळ्यात अतीथंडपणाने गारठून जायचे, त्यामुळे नोव्हेंबरचा मध्यबिंदू गाठला की आपल्यासारख्या पर्यटकांच्या शरीरमनाला मानवेल अशाच वातावरणाचा स्पर्श आपल्याला होतो. मेवाडच्या राजघराण्याची ऐतिहासिक संचित असलेली राजधानी, आरवली पर्वतावर वसलेले हे नगर तिथल्या राजऐश्वर्यामुळे भव्यदिव्य भासतात. राजवैभवाच्या खुणा मिरविणारे भव्य प्रासाद, प्रशस्त उद्याने, स्वच्छ पाण्याचे तलाव आणि जागोजागी उभारलेल्या सुंदर कमानी हे या शहराचे वैशिष्ट्य. पिछोला तलावात स्थित असलेला राजप्रसाद हे इथले आकर्षण, तर मीरेचे विष्णू मंदिर भक्ती परंपरेचे शिरोमणी ठरावे असेच आहे. त्याशिवाय रक्तरंजित लढाईचा इतिहास अधोरेखित करून राजा महाराणा प्रतापसिंग व त्याचा इमानी घोडा चेतक यांच्या स्मृती जतन करणारा ‘हल्दीघाट’, मांडलगड, कुंभालगड, एकलिंगजी इ. क्रांती व भक्ती, तेजस्वी आणि ओजस्वीपणाची अनुभूती उदयपूरच्या मातीशी समरस झालेली दिसते. महाराजा उदयसिंगच्या कालखंडात उदयपूरचा शिस्तबद्ध विकास झालेला दिसतो. राजस्थानी आणि मोगल स्थापत्यशैलीचा आविष्कार सिटी पॅलेसच्या माध्यमातून प्रचितीस येतो. हा भव्य दिव्य राजप्रसाद पाहातानाच तेथील वैभव डोळे दीपवून टाकते. सर्व बाजूंनी या भागाला आरवली पर्वतरांगा, जंगलभाग आणि तलाव यांचे नैसर्गिक अधिष्ठान लाभलेले आहे. या राजप्रसादात तत्कालीन काळातील राजांनी, त्यांच्या वारसानी वापरलेल्या सर्व वस्तू पाहायला मिळतात. पांढर्या संगमरवरी दगडांचा त्यांच्या बांधावळीसाठी केलेला वापर तर सौंदर्यात अधिक भर घालतो. या राजप्रसादातील छोटे मोठे महाल तेवढेच कलापूर्ण आहेत. बाडी महल, दिलखुशाल महल, माणक महल या नावाने परिचित आहेत. राजमहलांपासूनच थोड्या दूर अंतरावर प्रसिद्ध विष्णू मंदिर आहे. त्यात चर्तुहस्त असलेली भगवान विष्णूची सुंदर मूर्ती स्थिरावलेली आहे. अभ्यासकांच्या मते हे विष्णू मंदिर उत्तर भारतातील सर्वांत मोठे मंदिर आहे. याच मंदिराच्या आसपास सूर्य, शक्ती, गणपती, शिव अशी चार छोटीमोठी मंदिरे आहेत. पायर्या चढूनच या मंदिरात जावे लागते. या मंदिरासमोरच पितळ धातूपासूनची गरुडाची मोठी मूर्ती दर्शनी भागातच आहे.
उदयपूरला तलावाचे शहर हे नाव मिळालेले आहे. असे नाव या नगरीला प्राप्त व्हावे अशाच येथील तलावांचा लौकीक आहे. पिछोला तलाव तर डोंगररांगा, आंघोळीसाठीचे वैविध्यपूर्ण घाट, एकापेक्षा एक सरस महाल आणि मंदिरे यामुळेच या तलावाचे सौंदर्य अधिकच खुलून उठलेले आहे. सौंदर्य, कलात्मकता आणि पावित्र्याचा संगम येथे आहे. महाराणा संग्राम सिंह दुसरा यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्य केले. जल महलला विकसित करून त्याला कलापूर्ण बनविले. बडामहाल, खुशमहाल, नहर, फुलमहाल, धौला महाल व वेगवेगळ्या तर्हेचे फवारे बनविले जेणेकरून इथल्या जनतेला त्याचा आस्वाद घेता येईल. ‘बागोर की हवेली’ जी आज उदयपूर पश्चिमी सांस्कृतिक केंद्रच्या माध्यमातून लोककला, लोकसंगीताचा ठेवा जतन करताना दिसून येते. गौरी उत्सव राजस्थानामधील लोकमानसाचा महत्त्वपूर्ण उत्सव. सजविलेल्या गणगौरी स्त्रिया डोक्यावर घेऊन पाणी भरण्यासाठी जातानाचा देखावा अभूतपूर्व असतो. उदयपूर शहर म्हणजे राजस्थानच्या लोककलेचा आत्माच म्हणावा लागेल एवढे संचित या प्रदेशाला वेढून आहे. येथील प्रत्येक वास्तू आकर्षक, कलापूर्ण जीवन अगदी ऐषआरामी व तेवढेच कलासक्त मनाने जगायचे. इथल्या लोकमानसाची रसिकता इथल्या महालांमधून, गुलाबाच्या बागेतून, स्मारकातून, विविध तलावांच्या आकर्षक बांधकामातून प्रतिबिंबित होते. एकूणच वेगवेगळ्या तलावांनी परिपूर्ण असलेले हे शहर उत्साहपूर्ण मनाचे दर्शन घडविते. लोककला मंडपामधून या स्वत:च्या मातीचे संचित मन:पूर्वक जतन करण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य असाच आहे. तसे पाहायला गेलो तर प्रत्येक प्रदेशाला स्वत:चे असा एक सांस्कृतिक वारसा असतो. तो येणार्या प्रत्येक पिढीला ज्ञात व्हायला हवा म्हणून जतन केला तर तो काळाच्या ओघात राहातो. त्या त्या प्रदेशाचे वेगळेपण त्यामुळेच इतरांच्या लक्षात येते. इतर राज्यांपेक्षा राजस्थानने यात खूपच बाजी मारलेली आहे. भारतीय लोककला मंडल, हे लोक संस्कृती संग्रहालय आहे, जिथे एकाच टप्प्यात राजस्थान एकत्रित अनुभवता येते. रासलीला, गौरी, भवाई लोकनृत्य, रामलीला, सांस्कृतिक खेळ, आदिवासी भिल्लांची विवाह परंपरा, त्यांची जीवनपरंपरा या सगळ्याचेच दर्शन घडते. लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक उपक्रम इथे सातत्याने राबविले जातात, जेणे करून अभ्यास, संशोधनाच्या निमित्ताने आलेले पर्यटक येथे तासन्तास रेंगाळतात. ‘सहेलियों की बाडी’ हे तर सर्वांगसुंदर उद्यान – खास महिलांसाठी, मैत्रिणींना एकत्रित विहार करण्यासाठी म्हणून बांधण्यात आलेले आहे. त्याची रचनाच एवढी कलापूर्ण आहे की इथे जाऊन ते अनुभवण्याचा मोह आवरता येत नाही. सुरूवातीला जरी ते महिलांसाठी असले तरी पुरुष पर्यटकांना बंदी नाही. हत्तीच्या सोंडेतून बाहेर पडणारे फव्वारे श्रावण भाद्रपदातील पाऊससरींची आठवण करून देतात. या ठिकाणी हरियाळी अमवास्येला खास महिलांसाठी जत्रा भरते. या जत्रेला पर्यटकांची तोबा गर्दी होते. राजस्थानने आपल्या वारशाचे जतन मन:पूर्वक करण्याचे प्रयत्न केलेले आहे.