…तर स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारांना मोठा दंड

0
11

>> मुख्यमंत्र्यांचा इशारा; कामे निकृष्ट झाल्यास पुन्हा नव्याने करून घेणार

>> आतापर्यंत झालेल्या कामांचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू

पणजी स्मार्ट सिटीच्या आतापर्यंत झालेल्या कामांचा अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हा अहवाल सरकारच्या हाती आल्यानंतर निकृष्ट व दर्जाहीन काम केलेल्या कंत्राटदारांना दंड ठोठावण्यात येईल. तसेच जे काम निकृष्ट व दर्जाहीन झाले आहे, असे दिसून येईल, ते काम पुन्हा नव्याने करण्याचा आदेश त्यांना देण्यात येणार असल्याचे काम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

काल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना स्मार्ट सिटीच्या कामांवरून छेडले असता त्यांनी वरील माहिती दिली. या कामाचा अहवाल लवकरच आमच्या हाती येणार असल्याचे सांगून तो हाती आल्यानंतर कंत्राटदारांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या कंत्राटदारांवर कारवाई होणारच असल्याचे सांगून कुणावरही दयामाया केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी
स्पष्ट केले.

स्मार्ट सिटीची कामे ही पुढील 25 वर्षांचा विचार करून करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पणजीतील सांडपाण्याचा प्रश्न हा गंभीर असल्याचे सांगून त्यावर तोडगा काढणार असल्याचे ते म्हणाले. भविष्य काळासाठीची ही कामे असल्याने नागरिकांनी आणखी थोडी कळ सोसावी, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
दरम्यान, गेल्या जवळपास दोन वर्षांपासून राजधानी पणजीत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे सुरू आहेत. ही कामे करताना नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय स्मार्ट सिटीची जी कामे केली जात आहेत, त्या कामांच्या दर्जाबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या कामांचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरच ती किती उच्च दर्जाची झाली आहेत हे स्पष्ट होणार आहे.