पुत्राविरुद्धच्या आरोपांमुळे व्यथित
उत्तर प्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भ्रष्टाचाराच्या कारणावरून आपल्या मुलाला तिकीट नाकारण्यात आल्याच्या आरोपाचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी इन्कार केला आहे. या संदर्भातील आपला मुलगा व कुटुंबियांबाबतच्या अफवा तथ्यहीन आहेत. वरील आरोप खरे ठरल्यास आपण राजकारणातून संन्यास घेईन असेही राजनाथ यांनी म्हटले आहे.
मुलावरील आरोपांमुळे राजनाथ सिंग अस्वस्थ झाल्याचे वृत्त पसरल्यानंतर या प्रकरणी त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आपल्या मुलाविषयी खोट्या बातम्या पसरविण्यात येत असल्याविषयी राजनाथ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेत्यांशी व्यक्त केली. पक्षातील विरोधी घटकांनीच या अफवा पसरविल्याचा दावा त्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनाथ यांच्या मुलाला तिकिट देऊ नये असे निर्देश दिल्याच्या वृत्तामुळे राजनाथ व्यथित झाल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आपल्या मुलाविषयी प्रसारमाध्यमांमध्ये जे प्रसिद्ध झाले ते खरे नसल्याची माहिती राजनाथ यांनी संघ नेत्यांना दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. राजनाथ यांचे भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांशी मतभेद आहेत. २००९ साली त्यांचे अरुण जेटली यांच्याशी जाहीर खटले उडाले होते. सुधांशू मित्तल यांना आसामचे प्रभारी करण्यासंदर्भात राजनाथ व जेटली यांच्यात मतभेद होते.
पंतप्रधान मोदींकडून राजनाथांचा बचाव
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे पुत्र पंकज सिंग यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून होणार्या आरोपांसंदर्भात अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनाथ यांच्या बचावार्थ धावून आले. हा निव्वळ खोटारडेपणा आहे असे मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयातर्फे याप्रकरणी ट्विट करण्यात आले आहे.
चारित्र्यहननाचा हा अश्लाघ्य असा प्रकार असल्याचे त्यात म्हटले आहे. सरकारची प्रतिमा डागाळण्याचाही हा प्रकार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. अशा प्रकारचा अफवा पसरविणारे लोक देशहिताला बाधा आणत असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे.