… तर म्हादईप्रश्‍नी मोठे आंदोलन : दिगंबर

0
128

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांना नवी दिल्लीत दिलेल्या आश्‍वासनानुसार जर गोव्याचा म्हादई प्रश्‍न येत्या काही दिवसांत सोडवला नाही तर गोव्यात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी काल सांगितले.

नवी दिल्लीत जंतरमंतरवर गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे काल म्हादईप्रश्‍नी आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलन कार्यक्रमाच्या वेळी कामत हे बोलत होते. म्हादई नदी वाचवण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढणार असल्याचे यावेळी कामत यांनी सांगितले.

प्रमोद सावंत यांची
म्हादईप्रश्‍नी तडजोड : चोडणकर
यावेळी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रातील मोदी-शहा या जोडगोळीशी हातमिळवणी करून म्हादई प्रश्‍नी तडजोड केली आहे. कर्नाटकातील नुकत्याच झालेल्या विधानसभा पोट निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप त्यानी केला.
म्हादईचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असताना केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यानी म्हादईप्रश्‍नी हस्तक्षेप करून कर्नाटकच्या कळसा व भंडुरा प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवल्याबद्दल त्यानी जावडेकर यांच्यावर कडक शब्दात टीका केली. कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवल्यास गोव्याच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम तर होणार आहेतच शिवाय पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होणार असल्याने लोकांच्या जीवनावरही परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले.

भाजप सरकारकडून
दडपशाही : लुईझिन
आमदार तथा अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस लुईझिन फालेरो म्हणाले की केंद्रातील भाजप सरकारने सध्या दडपशाही चालवली असून लोकशाहीचा गळा घोटला आहे. केंद्र सरकार विविध संस्था, भाषा, प्रादेशिकता, नद्या आदींचा नाश करू पाहत आहे. केवळ आपल्या राजकीय लाभासाठी ते हे करीत आहेत.

पंतप्रधान गोव्याचा बळी
देऊ पाहतात : सार्दिन
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यानी म्हादई प्रश्‍नी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याचा बळी देऊ पाहत असल्याचा आरोप केला. आपण म्हादई प्रश्‍नी संसदेत आवाज उठवीत राहणार असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, युवा कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, मेघशाम राऊत, दशरथ मांद्रेकर, ग्लेन काब्राल यांचीही भाषणे झाली.
घटनास्थळी झालेल्या सभेनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी त्यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला असता पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी दिगंबर कामत व गिरीश चोडणकर यानी निवेदनाची प्रत जंतरमंतर येथील पोलीस प्रमुखांकडे सपूर्द करून पीएमओत पाठवून देण्याची त्यांना विनंती केली.