…तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर होणार कडक कारवाई

0
16

>> शेतकऱ्यांच्या तक्रारींचे फोन उचलत नसल्याने पशुसंवर्धन खात्याच्या संचालकांचा इशारा

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांच्या तक्रारी संबंधीचे फोन कॉल्स न स्वीकारणाऱ्या पशुवैद्यकीय खात्याच्या साहाय्यक संचालक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. आगोस्तीन मिस्किता यांनी काल एका परिपत्रकाद्वारे दिला.

पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हर्ळणकर यांनी खात्याचे वरिष्ठ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी हे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांसंबंधीच्या तक्रारींबाबत सरकारने उपलब्ध करून दिलेल्या फोनवर केलेले कॉल्स कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर, तसेच रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी स्वीकारत नसल्याचे डॉ. मिस्किता यांच्या निदर्शनास काही दिवसांपूर्वी आणून दिले होते.
पशुसंवर्धन खात्याच्या विविध योजनांखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुभती जनावरे खरेदी केली आहेत. तथापि, दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योग्य मदत मिळत नाही, अशी तक्रार आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. मिस्किता यांनी पशुसंवर्धन खात्याकडून एक परिपत्रक जारी केले आहे.
पशुसंवर्धन खात्यात काम करणारे साहाय्यक संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळविण्यात येत आहे की, त्यांची सेवा केवळ कार्यालयीन कामकाजापुरती मर्यादित नाही. त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजेनुसार संपूर्ण दिवस उपलब्ध राहण्याची गरज आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे. साहाय्यक संचालक, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून करण्यात येणारे फोन कॉल्स स्वीकारले पाहिजेत. तसेच, भेदभाव न करता दूध उत्पादक शेतकऱ्याला गरजेनुसार आवश्यक मदत केली पाहिजे.
या सूचनेचे पालन न करणाऱ्या तक्रारीची गंभीर दखल घेतली जाणार असून संबंधित अधिकाऱ्याविरोधात शिस्तभंग प्रकरणी कारवाई केली जाणार आहे, असा इशारा डॉ. मिस्किता यांनी दिला आहे.