तर टी-ट्वेंटी वर्ल्डकप अन्यत्र हलवणार

0
117

>> आयसीसीची बीसीसीआयला धमकी

केंद्र सरकारकडून करात सूट मिळविण्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अपयशी ठरल्यानंतर क्रिकेटचे संचालन करणारी सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीसीने भारताकडून टी-ट्वेंटी विश्‍वचषक (२०२१) स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्याची धमकी काल मंगळवारी दिली.
२०१६च्या भारतात झालेल्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेपासून बीसीसीआय व आयसीसी यांच्यात करावरून युद्ध सुरू आहे.

करातून सूट न मिळाल्यामुळे ‘त्या’ स्पर्धेत आयसीसीला २० ते ३० मिलियन डॉलर्सचा तोटा झाला होता. यानंतर आयसीसीच्या केंद्रीय कराराद्वारे बीसीसीआयच्या वाट्यातून ही रक्कम वजा करण्यात आली होती. यामुळे संतापलेल्या बीसीसीआयने आयसीसीच्या तंटा लवाद समितीकडे धाव घेतली होती. या प्रकरणाचा निकाल अजून लागलेला नाही. हा वाद मिटलेला नसतानाच आता नवीन वाद सुरू झाला आहे.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना यावर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पत्र लिहून करात सूट देण्याबद्दलची माहिती देण्यास सांगितले होते. यानंतर आयसीसी जनरल काऊन्सिलच्या जोनाथन हॉल यांनीदेखील करमाफीबाबत उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती मागितली होती. फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत बीसीसीआयने डिसेंबर २०१९ पर्यंत यावर तोडगा काढण्याचे वचन दिले होते, याची आठवणदेखील हॉल यांनी करून दिली होती. आयसीसीने मुदत वाढवून १७ एप्रिलपर्यंतचा वेळ दिला होता. परंतु, त्यापूर्वीच कोरोनामुळे लॉकडाऊन झाले.लॉकडाऊन उठवल्यानंतर किमान ३० दिवसांचा वेळ आयसीसीने द्यावा, अशी मागणी बीसीसीआयने केली आहे.

परंतु, यामुळे आयसीसी संतापली असून करारातील कलमाप्रमाणे कालावधीत तोडगा न निघाल्यास यजमानपद काढून घेण्याचे हक्क आपल्याकडे असल्याचे सांगत त्यांनी बीसीसीआयला धमकीवजा इशारा दिला आहे.

भारतच असेल यजमान
आयसीसीमधील काही अधिकारी बीसीसीआयशी तंटा करण्यात आपले सुख मानतात. आयसीसीने अशा लोकांना आपल्यापासून दूर ठेवले पाहिजे. बीसीसीआयचे आयसीसीसाठीचे योगदानाची अशा लोकांना काही कल्पना नाही. त्यामुळे आयसीसीने कोणतेही मोठे पाऊल उचलताना हजारवेळा विचार करावा, असे बीसीसीआयने म्हटले आहे. आयसीसीने घाईघाईत कोणताही निर्णय घेणार नाही, असा विश्‍वासही बीसीसीआयने व्यक्त केला.