एका वृत्तवाहिनीचा गौप्यस्फोट
मोस्ट वॉन्टेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा पाकिस्तानात वर्षभरापूर्वी खात्मा करण्याची संधी भारताकडे चालून आली होती. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी मुख्य कमांडोला फोनवरून गोळी न चालवण्याचे आदेश आल्याने १९९३ च्या मुुंबई बॉंबस्फोट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सध्या पाकिस्तानात मोकळेपणाने फिरत असल्याचा गौप्यस्फोट एका वृत्तवाहिनीने केला आहे. या गुप्त मिशनबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तचर संघटना गेल्या २० वर्षांपासून दाऊदच्या मागावर असून त्याला ठार मारण्यासाठी भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’ने नऊ एजंटचा समावेश असलेले एक खास कमांडो पथक पाकिस्तानात धाडले होते. त्यांना सुदान, बांगलादेश आणि नेपाळ या देशांचा पासपोर्ट देण्यात आला होता. या टीमला ‘सुपर बॉइज’ असे गुप्त नाव ठेवण्यात आले होते. या ऑपरेशनसाठी रॉला इस्राइलच्या मोसादकडून मदत मिळत होती.
दाऊद अनेक वर्षांपासून कराचीमध्येच वास्तव्याला आहे. तो रोज त्याच्या क्लिप्टन रोडवरील घरातून डिफेन्स हाऊसिंग सोसायटीकडे जात असे. याचदरम्यान दाऊदला संपवण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार ‘सुपर बॉइज’ने या मार्गावर असलेल्या दर्ग्याजवळ दाऊदला शूट करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
नियोजीत प्लॅननुसार १३ सप्टेंबर २०१३ च्या दिवशी हे नऊ कमांडोज दर्ग्याजवळ दबा धरून बसले होते. दाऊद कसा दिसतो, याबद्दल सर्व कमांडोजला पूर्ण माहिती असल्याने शिकार चुकण्याचा प्रश्न नव्हता. काही क्षणातच दाऊदची गाडी दर्ग्यासमोर येणार तेवढ्यातच मुख्य कमांडोला फोनवरुन गोळी न चालवण्याचे आदेश दिले गेल्याने सगळा प्लॅन फसला असा दावा सदर वृत्तवाहिनीने केला आहे. सदर वेळी दाऊद समोरून गेला पण त्याचा खात्मा मात्र होऊ शकला नाही. दरम्यान, हा कॉल कुणी आणि का केला होता, याबद्दल माहिती देण्यास संबंधित सूत्रांनी नकार दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेने ज्याप्रमाणे कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून कंठस्नान घातले होते तशाच प्रकारे मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमला ठार मारण्याची संधी भारताकडे चालून आली होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला हे मिशन रद्द करण्यात आल्याने कुख्यात दहशतवादी आजही पाकिस्तानात मोकळेपणे फिरत आहे.