‘तहलका’चे माजी संपादक तरूण तेजपाल यांच्यावर म्हापसा सत्र न्यायालयाने काल सहकारी महिला पत्रकाराच्या लैंगिक शोषण प्रकरणी आरोप निश्चित केले. याप्रकरणी पुढील सुनावणी आता २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. बलात्कार, लैंगिक शोषण व अन्य कलमांखाली तेजपाल यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आरोपपत्राची प्रत त्यांना देण्यात आली आहे. तसेच सर्व आरोपांविषयी त्यांना काल न्यायालयाने सविस्तर माहिती दिली.
बांबोळी येथील एका पंचतारांकीत हॉटेलमधील लिफ्टमध्ये आपल्याच सहकारी महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याचा तेजपाल यांच्यावर आरोप आहे. सदर हॉटेलमध्ये २०१३ साली आयोजिलेल्या थिंक फेस्ट महोत्सवा दरम्यान ही कथित घटना घडली होती.
या कथित घटनेनंतर पीडित महिला पत्रकाराने आपल्या वरिष्ठ सहकारी महिलेला या प्रकाराची माहिती दिली होती. त्या दरम्यान पीडिता, तहलकाच्या त्या वेळच्या संपादक शोमा चौधरी यांचा ई-मेलद्वारा झालेला संवादही प्रसिध्द झाला होता. त्यानंतर याप्रकरणी औपचारिक तक्रार नोंद झाल्यानंतर तेजपाल यांना गोवा पोलिसांनी अटक केली होती. काल सुनावणी दरम्यान आपण निर्दोष असल्याचे सांगण्याचा तेजपाल यांनी प्रयत्न केला. मात्र न्यायाधीश विजया पोळ यांनी ते मान्य केले नाही अशी माहिती सरकारी वकील फ्रन्सिस्को तावोर यांनी दिली.
दरम्यान तेजपाल यांनी आपल्याविरोधातील आरोप हटवण्यात यावेत अशी मागणी म्हापसा सत्र न्यायालयाकडे केली होती. ही मागणी ७ सप्टेंबर रोजी न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर आपल्या विरोधात आरोप निश्चित करण्यास मनाई करण्यात यावी अशी आव्हान याचिकाही तेजपाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली होती. ही याचिकाही दोन दिवसांपूर्वी फेटाळण्यात आली. तेजपाल यांच्याबरोबर काल त्यांचा भाऊ होता. तेजपाल यांचे वकील राजीव गोम्स यांनी आरोप निश्चितीमुळे आपण निराश झाल्याचे सांगितले. उच्च न्यायालय दिलासा देईल अशी अशा त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणाचे तपास काम पोलीस उपअधिक्षक सुनिता सावंत यांच्याकडे आहे.
तेजपाल यांच्यावरील कलमनिहाय आरोप
– भा. दं. सं. कलम ३५४- ए : लैंगिक
सतावणूक व लैंगिक सतावणुकीबद्दल दंड
– कलम ३७६ (२) (के) : वरीष्ठ पदावरील व्यक्तीकडून
हाताखाली काम करणार्या महिलेवर बलात्कार
– कलम ३४१ व ३४२ : गैर हेतूने रोखणे. कलम ३७६ (२) (एफ) : अधिकार, असलेल्या विश्वासार्ह असलेल्या व्यक्तीकडून हाताखालील महिलेवर बलात्कार करणे.
– कलम ३७६ : (अधिकारी व्यक्तीने केलेला संभोग) व कलम ३५४