तरुणाला मारहाण प्रकरणी मडगाव पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन

0
3

नावेली येथील एडबर्ग पेरेरा नामक (वय 37) तरुणाला केलेल्या मारहाण प्रकरणात मडगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर यांना काल निलंबित करण्यात आले. दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी ही माहिती दिली.

मारहाणीची सदर घटना 22 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 2 वाजता घडली होती. नावेली येथील एका व्यक्तीने मडगाव पोलीस ठाण्यावर फोन करून रोझरी महाविद्यालयाजवळ एक तरुण दंगामस्ती करत असून, लोकांना शिवीगाळ व मारहाण करत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार हेड कॉन्स्टेबल मिंगेल व्हाज व अजय सांगली हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एडबर्गला विचारपूस केली असता त्याने पोलिसांशी उर्मट वर्तन करून त्यांच्याशी भांडण सुरू केले. त्यानंतर तो जवळील चिकन दुकानाजवळ जाऊन महिलेला शिवीगाळ करू लागला.

स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी अतिरिक्त मदत मागवली. पोलीस कर्मचारी रॉबर्ट वाहनाद्वारे घटनास्थळी पोहोचून एडबर्गला ताब्यात घेऊन मडगाव पोलीस स्थानकात आणण्यात आले. त्यावेळी उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर ड्युटीवर होते. चौकशीदरम्यान एडबर्गने पोलिसांशी वाद घातला व मारामारी सुरू केली. तसेच शिवीगाळही करू लागला. त्याला आवर घालताना पोलिसांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येते. या दरम्यान एडबर्ग खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर मार बसला.

जखमी अवस्थेत एडबर्ग याला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय (बांबोळी) येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली असून, सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रतिमा कुतिन्हो यांनी पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून प्रकरणाची दखल घेण्यास भाग पाडले. एडबर्गला झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध प्रतिमा कुतिन्हो, आपचे अध्यक्ष अमित पालेकर आणि सिद्धेश भगत यांनी केला आहे.