तरुणांच्या नोकर्‍या संकटात

0
100

>> प्रख्यात वैज्ञानिक डॉ. माशेलकर यांचा इशारा

 

डिजिटल डिस्ट्रक्शनमुळे आज अनेक बदल घडून येत आहेत. आपल्याला पुढे जायचे असेल तर जग कुठे जाणार हे बघायला हवे. नोकरी, व्यवसायाचे स्वरूप पण बदलणार आहे. तेव्हा शिक्षण, अभ्यासक्रम बदलायला हवा. ऑटोमेशन, रोबोट्‌स, आर्टीफशियल इंटेलिजन्समुळे नोकर्‍यांचे प्रमाण घटल्याने भारतात तरुणांच्या नोकर्‍यांचे काय होणार याचा विचार करावा लागेल असा इशारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक गोमंतभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काल येथे दिला.
गोमंतक मराठा समाज, गोवातर्फे काल संस्थेच्या येथील सभागृहात झालेल्या ‘युवा परिषद २०१६’चे उद्घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने डॉ. माशेलकर बोलत होते. ‘युवा दृष्टीक्षेप २०३५’ या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या बीज भाषणात युवकांना अत्यंत मौलिक स्वरुपाचे मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे प्रा. उदय बाळ्‌ळीकर, केलीफोर्निया विद्यापीठात पीएच्‌डी करणारे आयआयटी मद्रासचे पदवीधारक कुणाल कोरगावकर, संस्थेचे अध्यक्ष गुणा शंकर नाईक, उपाध्यक्ष किशोर कोरगावकर, सचिव सतीश हळदणकर, कोषाध्यक्ष रितेश नार्वेकर, परिषदेचे प्रमुख समन्वयक कपिल कोरगावकर उपस्थित होते.
विद्यार्थी परीक्षार्थी नव्हे ज्ञानार्थी आले पाहिजेत. शिक्षण घेण्याचा अधिकार योग्य शिक्षण घेण्यात परावर्तीत झाला पाहिजे, असे सांगून दर्जात्मक शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे असे मत डॉ. माशेलकर यांनी व्यक्त करून मुलांचे भवितव्य तुम्ही घडवत आहात त्यात भारताचे भविष्य आहे याकडे निर्देश केला. माझ्या आईने माझ्या शिक्षणाचा ध्यास धरला म्हणून मी इथे पोचलो. ती अशिक्षित होती. पण तीने शिक्षणाला महत्त्व दिले. शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही या अपमानाला तिला एकदा सामोरे जावे लागले तेव्हा तिने आपल्या मुलाला इतके शिक्षण देईन की तो उच्च पदाला पोचेल असा दृढ निश्‍चयच केला आणि त्यासाठी खूप कष्ट सोसले. त्यावेळी गोमंतक मराठा समाजाने दिलेली पाच रुपयांची शिष्यवृत्ती मला कामी आली. त्यामुळे मी आज इथे आहे असे ते कृतज्ञ भावनेने म्हणाले. युवकांनी विचार करण्याची पध्दती बदललेली आहे. मायक्रोसॉफ्ट सारख्या विदेशी कंपनीत जाऊन नोकरी करण्यापेक्षा आम्हांला स्वत:चा मायक्रोसॉफ्ट, गुगल बनवायचा आहे असे तरुण म्हणू लागलेत. हा युवा दृष्टीक्षेप ३५ असणार आहे, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले. समाजाच्या शिक्षणार्थी योजनेसाठी सव्वालाख रुपये व ज्या मुंबई येथील गोमंतक मराठा समाजाच्या त्याकाळी मिळालेल्या पाच रुपयातून शिकलो त्या संस्थेला त्यांनी सव्वालाख रुपये देणगी देत असल्याचे यावेळी जाहीर केले.
नंदकिशोर शिरगावकर यांनी बनवलेली चांदी मिश्रित धातूची आकर्षक समई भेट देण्यात आली व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. डॉ. माशेलकर यांच्या हस्ते प्रारंभी समाजाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. गोमंतक मराठा समाजावरील वारसाहा माहितीपट यावेळी दाखवण्यात आला.