- डॉ. सुरज स. पाटलेकर
(अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)
फोनसारख्या प्रलोभनांपासून दूर ठेवणे, चांगली व उत्तम दर्जाची पुस्तके वाचणे, योग्य संगतीत असणे, व्यसनांपासून दूर राहणे आणि मानसिक समस्यांवर तातडीचे उपचार करणे आज अत्यंत गरजेचे आहे. भारताची तरुण पिढी उत्तम, हुशार, उद्योगी आणि उच्च नीतिमत्ता असणारी बनवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
जेथे आपण स्वास्थ्याबद्दल बोलतो तेव्हा शारिरीक स्वास्थ्यासोबत मानसिक स्वास्थ्यही तेवढेच महत्वाचे आहे. आजकालची तरुणाई ज्या तणावग्रस्त परिस्थितीतून जात आहे, ते पाहणे खूपच त्रासदायक आहे. ह्याचे प्रमुख कारण स्वतःची व आसपासच्या लोकांची पुढे जाण्यासाठीची स्पर्धा तर नक्कीच आहे पण त्यासोबत बिघडत चाललेले मानसिक स्वास्थ्यदेखील तेवढेच कारणीभुत आहे. सतत यशस्वी व्हावे ही नक्कीच प्रत्येकाची इच्छा असतेच व यात काहीच वावगे नाही. पण त्यासोबत जर एखाद्या वेळी अपयश आले तर ते पचवण्यासाठी तय्यारी मात्र कधीच नसते.
यामध्ये प्रेमात अपयश, मनासारखी नौकरी न मिळणे किंवा जर मिळालीच तर तेथील कामाचा व्याप, तिथले डेडलाईन्स, काम जास्त पण पगार हवा तसा न मिळणे, एखाद्या वेळेस बॉसचा त्रास, सहकार्यांचा सहयोग नसणे, शिफ्ट्सचा त्रास, वेळेअभावी व टेंशनमुळे झोप व्यवस्थित न मिळणे, घरी आल्यावार परिवारातील लोकांनी समजुन न घेणे, त्यांच्या इच्छाअपेक्षा पुर्ण करायला वेळेचा अभाव यांसारख्या कित्येक गोष्टी मानसिक तणावाला कारणीभुत ठरु शकतात. आणि मग ड्रग्स, मद्यपान व धुम्रपानाच्या (यामध्ये तंबाकू, गुटखा, सिगरेटसारख्या गोष्टिसुद्धा येतात) आहारी जाणे हे ठरलेलेच. तरुणांना वाटते की ही व्यसने केल्याने आयुष्यातील तणाव कमी होतील पण उलट त्या वाढतात. आजपर्यंतच्या सर्वेक्षणानुसार ड्रग्स, मद्यपान, धूम्रपान करणारी, जुगार खेळणार्या ७०-७५% व्यक्तिनां काही ना काहीतरी मानसिक तणाव आहेत किंवा होते आणि त्यांच्या तणावांचे निरसन नंतर होईलही पण तोपर्यंत ह्या व्यसनांची लत लागलेली असते आणि ते सोडवणे कठिण होऊन बसते. ह्याच ड्रग्स, मद्यपान, धुम्रपानामुळे नंतर कर्करोग, दमा तसेच यकृतासारखेच बाकीचे अवयवही निकामी होणे, हृदयाचे विकार, हार्ट ऍटॅक, सतत खोकला येणे, पोटात पाणी साचणे, मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढणे इत्यादींसारख्या तक्रारी नव्याने उत्पन्न होतात. काहींना तर.. ‘रोज मद्य का पीता..’, असे विचारले असता त्यांची उत्तरे असतात की- ते जी मद्य पितात त्याचा आल्कोहोल कंटेंट बाकीच्या आल्कोहोलपेक्षा कमी आहे. दारुतसुद्धा ५% आल्कोहोल असेल किंवा ४०%. दारु ही शरिराला घातकच असते. आजच्या समाजात तर सगळ्यात जास्त दारु जो पिऊन पचवु शकतो त्यालाच मॅच्युरिटी समजले जाते.
तणावासाठी व्यसन हा पर्याय कोणीच सांगितलेला नाही व होऊही शकत नाही. म्हणजेच असे होईल की एका त्रासातून, संकटातून बाहेर येण्यासाठी दुसर्या संकटाला मीठी मारून आपलेसे करणे. उलट त्रास तर दुप्पटच वाढतील. आजपर्यंत तरी असे एकही उदाहरण नसेल की व्यसनाने संकटातून मुक्ती मिळाली.
व्यसनाने संकटातून मुक्ती मिळाली… पण खरे बघायला गेले तर व्यसन म्हणजे एक चक्रव्यूह असते. तुम्ही जितके त्यातून बाहेर पडायला बघात तितके आत अडकत जाल. अशावेळी स्वयं संतुलन, कुटुंबाचा आधार, व्यसनातून बाहेर पडायची तीव्र इच्छाशक्ती या सर्वांची गरज असते. अनेक व्यसनमुक्ती केंद्रे मदत करण्यासाठी सक्रीय आहेत. मानसोपचार तज्ञांच्या मदतीने यातून बाहेर पडणे शक्य आहे.
आजच्या काळात खूप प्रकर्षाने भेडसावणारा प्रश्न म्हणजे सायबर क्राईम. लहान लहान मुलांच्या हातात दिला जाणारा फोन हे या मागचे सर्वात मोठे कारण आहे. फोन हे एक खेळणे नसून निव्वळ गरजेपुरती वापरण्याची गोष्ट आहे. लहान मुले न कळत्या वयामध्ये निरनिराळया प्रलोभनांना बळी पडतात. ज्या गोष्टी कळू नयेत त्या गोष्टी नको त्या वयामध्ये कळू लागल्या आहेत. या सर्वांमुळे आज भारतासारख्या देशात विनयभंगाच्या घटना वाढू लागल्या आहेत. बाल वयामध्ये गुन्हा करणे, बालगुन्हेगार निर्माण होणे यांची संख्या वाढीस लागली आहे. टीव्ही, चित्रपट यांतून दाखवले जाणार्या अपराध्यांच्या घटना किंवा झटपट पैसा मिळवून देणार्या कल्पना यामुळे मुलांची नीतिमत्ता ढासळू लागली आहे. याला बहुतांशी त्यांचे पालक जवाबदार आहेत. लहान मुलांवर नको ते ओझे लादणे, अपेक्षा करणे, त्यांचे करियर पालकांनी ठरविणे टाळले पहिजे.
एकेरी किंवा न्युक्लियर कुटुंबपद्धतीमुळे मुलांवर योग्य संस्कार होत नाहीत. घरात वडीलधारी माणसे नसल्यामुळे मुलांना दिवसभर त्यांच्यासकट घरात कोंडून ठेवले जाते. अश्यावेळी मुले त्यांना जे ज्ञान हवे आहे ते इंटरनेटवर पाहुन मिळवतात आणि बाल कुतूहलामुळे ते ज्ञान आजमावून पाहण्यची घाई त्यांना असते. जेव्हा मुलाना काही प्रश्न भेडसावतात किंवा काही समस्या येतात तेव्हा मोकळेपणाने न बोलता बर्याचदा ती गोष्ट समवयस्क मुलांसोबत शेयर केली जाते. यातून नको ते निष्कर्ष निघतात व उपाय सुचतात, व्यसने जडतात आणि गुन्हे घडतात. बहुतांश मुले या सर्वांमुळे नैराश्यग्रस्त होतात, ज्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे.
कधी कधी स्वतःच्या जीवनाच्या समस्या एखाद्या जवळच्या किंवा वडीलधार्या व्यक्तीच्या सहाय्याने सोडविणे जास्त सोपे होत असते आणि येथेच आजच्या बहुतांशी तरुणाईचे विचार चुकतात. त्यांना वाटते की ते आता एवढे मोठे (वयाने व पदवीनेसुद्धा) झाले आहेत की त्यांना कोणाचीच गरज नाहिये व त्यांचे घेतले गेलेले निर्णय बरोबरच असणार आणि हे निर्णय घ्यायची ताकत वडीलधार्या लोकांकड़े नाही. आजची तरुणाई हे स्वतःच्या समस्यांना स्वतः एकटे समोर जाण्यास पसंत करतात. परावलंबी होणे त्यांना आवडत नाही. आणि अश्यात कित्येक मुलेमुली ह्या औदासिन्यता (डिप्रेशन)च्या अवस्थेमध्ये प्रवेश करतात.
‘लेट्स टॉक इट आऊट’.. हा उपाय बर्याच समस्यांचे उत्तर आहे. आपल्यापेक्षा मोठ्या, जाणत्या माणसांकडे, कुटुंबातील जवाबदार व्यक्तिंकडे, फॅमिली डॉक्टर व मानसोपचार तज्ञांकडे जाऊन ह्या समस्यांचे उत्तर शोधणे खूप गरजेचे आहे. पालकांनी वयात येणार्या मुलांकडे लक्ष ठेवणे, त्यांना योग्य ते ज्ञान योग्य वयात देणे, योग्य संस्कार करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. एखादे मुल जर योग्य दिशेने जात नसेल तर त्याची कानउघाडणी करणे, त्यांना योग्य शब्दात, अपमानीत न करता समज देणे गरजेचे आहे. फोनसारख्या प्रलोभनांपासून दूर ठेवणे, चांगली व उत्तम दर्जाची पुस्तके वाचणे, योग्य संगतीत असणे, व्यसनांपासून दूर राहणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानसिक समस्यांवर तातडीचे उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. भारताची तरूण पिढी उत्तम, हुशार, उद्योगी आणि उच्च नीतिमत्ता असणारी बनवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.