देशभक्ती शिकवावी लागत नाही ती जन्मत:च अंगात असते, ९ ऑगस्ट हा क्रांती दिवस देशभक्तीच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा आहे. त्या दिवसाच्या स्मृतींनी मन जागे झाले तर राष्ट्र जागे होईल व आपले बळ वाढेल असे सांगून, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, त्यावेळी स्वातंत्र्य लढ्यात ‘चले जाव’ची क्रांती केली. आज दहशतवादी, नक्षलवादी, राष्ट्रद्रोही, भ्रष्टाचारी, अतिरेकी यांच्यासाठी ‘चलेजाव’ची क्रांतिकारी घोषणा करावी लागेल. त्यासाठी आळस आणि भेडकपणा या दोघांचा पराभव करावा लागेल.
लोकमान्य को-ऑपरेटिव्ह मल्टिपर्पज सोसायटी लिमिटेड; लोकमान्य टिळक विचारमंच, पुणे आणि गोवा शासनाचे कला आणि सांस्कृतिक संचालनालय यांच्या विद्यमाने ताळगाव पठारावरील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या ९ ऑगस्ट क्रांतिदीन सोहळ्यात शिवशाहीर पुरंदरे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. राष्ट्रभक्तीने भारलेल्या या शानदार सोहळ्यात व्यासपीठावर प्रमुख वक्ते माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळ, पुणेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर, लोकमान्यांचे पणतू शैलेश टिळक (अध्यक्ष, लोकमान्य टिळक विचारमंच), लोकमान्यांचे दुसरे पणतू डॉ. दीपक टिळक (दै. केसरीचे संपादक), वसंतराव गाडगीळ, सागर देशपांडे, लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा दै. ‘तरुण भारत’चे संपादक किरण ठाकूर व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारांचे वंशज उपस्थित होते.
बालभवन – पणजीच्या विद्यार्थ्यांनी गायिलेल्या गर्जा जयजयकार क्रांतीचा… या देशभक्तीपर गीताने सोहळ्याला प्रारंभ झाला. गोवा संगीत महाविद्यालयाच्या गानवृंदाने स्वागत गीत म्हटले. स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक असलेली मशाल पेटवून या सोहळ्याचे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले.
देशासाठी जगण्याची गरज : धर्माधिकारी
अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, ‘करेंगे या मरेंगे’ची घोषणा देणारे गांधीजी, तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा’ अशी घोषणा देणारे सुभाषबाबू, अंदमानला सिंहाच्या गुहेत रहावे तशी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक महान क्रांतिकारकांचा वारसा आपल्यापुढे आहे. या महान क्रांतिकारकांमुळेच आम्ही इथे बसलो आहोत. गोवा मुक्तीलढ्यात मोहन रानडे, तेलू मास्कारेन्स या स्वातंत्र्यसेनानी दिलेल्या योगदानाचा तसेच नानासाहेब गोरे, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या सहभागाचाही आवर्जून उल्लेख केला. सर्व क्षेत्रात आदर्श निर्माण करणार्या सुपुत्र आणि कन्या गोव्याने दिल्याचे सांगून, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, कविवर्य बा. भ. बोरकर, लता मंगेशकर व मंगेशकर कुटुंबीय, पं. अभिषेकीबुवा, रिबेलो आदींचा धर्माधिकारी यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. हे आदर्श घेऊन आज देशासाठी मरायची नव्हे तर सुराज्यासाठी जगायची गरज आहे, असे ते म्हणाले.
किरण ठाकूर यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की लोकमान्य टिळक यांची मंडालेहून सुटका होण्याच्या ऐतिहासिक घटनेस नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि गोवा मुक्तीसाठी सर्वस्व अर्पण करणार्या क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी व नव्या पिढीच्या मनात त्यांच्या त्यागाची, प्रेरणेची मशाल ज्वलंत ठेवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वंदे मातरम्ला वेदाचे रुप कसे आले व त्यातून त्यागाची भावना कशी निर्माण झाली हेही त्यांनी सांगितले. वसंतराव गाडगीळ यांनी मंत्रपठण केले. शैलेश टिळक यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमातून ‘स्वातंत्र्याचे सुराज्य केले पाहिजे’ हा संदेश घेवून आपल्याला जायचे आहे.
दीपक टिळक म्हणाले आपल्या देशाचे स्वातंत्र्य सहजतेने मिळालेले नाही. स्वातंत्र्यसेनानीनी जीवाची आहुती दिली आहे. क्रांतिकारकांच्या त्यागाची नव्या पिढीला माहिती व्हावी म्हणून हा कार्यक्रम आहे. टिळकांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते. हिंदुस्तानकडे आदराने आत्मीयतेने पहावे असा हिंदुस्तान निर्माण व्हावा यासाठी नव्या पिढीने झटले पाहिजे. हिमानीबाई सावरकर, अमिलेश सिंग, उमाकांत पिंगळे, अश्मातुल्लाखान यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गोविंद काळे यांनी आभार मानले.
क्रांतीकारांच्या वंशजांचा ह्द्य सत्कार
या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या हस्ते थोर क्रांतिकारांच्या वंशजांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हा क्षण भारावून टाकणारा हेाता. तात्या टोपेंचे वंशज सुभाष टोपे, अवंतीबाईच्या वंशज राणी कुसुम, १८५७ च्या लढ्यातील पहिला हुतात्मा झालेले मंगल पांडे यांचे वंशज रघुनंदन पांडे, वासुदेव बळवंत फडके यांचे वंशज अरविंद फडके, दामोदर चाफेकर यांचे वंशज अविनाश चाफेकर, अनंत कान्हेरे यांचे वंशज शशिधर कान्हेरे, भगत सिंग यांचे वंशज अमिलेश व किरणजीत सिंग, राजगुरूंचे वंशज सत्यशील राजकुरू, अश्फाकउल्ला खान यांचे वंशज अश्फाकउल्ला खान, महावीर सिंग यांचे वंशज असीम राठोड, उध्दम सिंग यांचे वंशज ग्यानसिंग, ठाकूर दुर्गासिंग यांचे वंशज विजय सुसोरिया, विष्णू पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे, बटूकेश्वर दत्त यांच्या वंशज सौ. मालती, रचिंद्रनाथ बक्षी यांचे वंशज राजेंद्रनाथ बक्षी, देवाभाई राणा यांचे वंशज राजेंद्र सिंह राणा, कॅप्टन राघव यांचे वंशज डी. पी. राघव, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशज हिमानीबाई सावरकर, दीनदयाळ उपाध्याय यांचे वंशज मधू वर्मा व लहुजी यांचे वंशज किसन जाधव यांचा तसेच गोव्याच्या शारदाताई सावईकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.