>> आसगाव प्रकरणात पोलीस, सत्ताधारी नेत्यांचे भू-माफियांशी साटेलोटे
प्रदीप आगरवाडेकर यांचे आसगाव येथील निवासी घर बुलडोझरने बेकायदेशीररित्या जमीनदोस्त कणऱ्याची जी घटना घडली, त्या घटनेचे तपासकाम सीबीआयकडे सोपवण्यात यावे. तसेच या प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक व अन्य पोलीस अधिकारी, तसेच सत्ताधारी राजकीय नेते यांचे भू-माफियांशी जे सटेलोटे आहे, त्याची चौकशी एका निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणी काल काँग्रेस पक्षाने केली.
सत्ताधारी राजकीय नेते व पोलीस अधिकारी यांच्या आशीर्वादाशिवाय परप्रांतीय भू-माफियांना गोव्यात येऊन एका गोमंतकीयाचे घर पाडणे शक्य नव्हते, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेला उपस्थित प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर व काँग्रेसचे आमदार कार्लूस फेरेरा यांनी याविषयी बोलताना पोलीस महासंचालक जसपाल सिंग हे आपल्या पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला. आगरवाडेकर यांचे घर पाडण्याची जी घटना घडली, त्या प्रकरणातील आरोपींना अभय देण्याचे काम सिंग हे करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशाल नाईक देसाई व उपनिरीक्षक संकेत पोखरे व इतरांना ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
ज्या पोलिसांचे आरोपींशी साटेलोटे आहे, त्या पोलिसांना निलंबित करावे. या प्रकरणात राज्याच्या पोलीस प्रमुखांचा हात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे तपासकाम गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस करू शकणार नाहीत. त्यामुळे तपासकाम सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी फेरेरा यांनी केली. यावेळी आमदार एल्टन डिकॉस्टा हेही हजर होते.
पोलीस प्रमुखांना निलंबित करा
घर जमीनदोस्त प्रकरणातील आरोपींशी गोव्याच्या पोलीस प्रमुखांचे साटेलोटे असल्याचा आरोप असून, त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी संपर्क साधून पोलीस प्रमुखांना निलंबित करण्याची सूचना करावी किंवा त्यांची गोव्यातून बदलीसाठी शिफारस करावी, अशी मागणी कार्लुस फेरेरा यांनी पत्रकार परिषदेतून केली.