तपस्वी गायक नट

0
56

मराठी संगीत रंगभूमीला मिळालेल्या नवसंजीवनीचे एक जवळचे साक्षीदार ज्येष्ठ गोमंतकीय गायक नट रामदास कामत यांनी साद देती हिमशिखरे म्हणत जगाच्या रंगभूमीवरून काल कायमची एक्झिट घेतली. आपण आणखी एक संगीतरत्न गमावले. आई, वडील, पत्नीच्या मृत्यूप्रसंगीही रंगभूमीच्या सेवेमध्ये खंड पडता कामा नये या विलक्षण कार्यनिष्ठेने मंचावर गायला उभा राहणारा, दिवसभर नोकरी करून नाटकाच्या तालमींसाठी रात्री जागवणारा, रात्रभर उभ्याने प्रवास करून येऊन थकलेल्या स्वरातही गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला उभा राहणारा एक सर्वथा समर्पित कलावंत आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. अशा माणसांचे अवघे जीवन हीच इतरांसाठी एक शिकवण असते, एक आदर्श असतो. रामदास कामत यांच्या ह्याच कार्यनिष्ठेला पाहून थक्क झालेल्या पु. ल. देशपांड्यांनी ‘मराठी रंगभूमी ही मंत्रितांची आहे, ती आमंत्रितांची नाही’ असे संस्मरणीय उद्गार काढले होते.
रामदास कामत आपल्या साखळीचे. वाळवंटीच्या काठी दत्तमहाराजांच्या पालखीचे पेणे गाणार्‍या वडिलांच्या सोबतीने ‘पंचतुंड नररुंड मालधर’ च्या चालीवर ‘त्रैलोक्याचा नाथ दत्तगुरू, साखळीत प्रत्यक्ष वसे’ सारखी गाणी गाता गाता लहानग्या रामदासात संगीताची आवड निर्माण झाली यात नवल नाही. वयाच्या सातव्या वर्षी चेहर्‍याला रंग फासून रंगभूमीवरही हे ‘बाळराजे’ उभे राहिले आणि पुढच्या चाळीस वर्षांत स्वतःचे साम्राज्यही रंगभूमीवर मोठ्या मेहनतीने, परिश्रमाने उभे केले. उताराला लागलेल्या संगीत रंगभूमीला पं. जितेंद्र अभिषेकींच्या संगीताने संजीवनी दिली त्यात प्रमुख गायक नट म्हणून रामदास कामतांचे योगदान राहिले हे विसरता येणार नाही.
मुंबईत शिक्षणासाठी असताना महाविद्यालयीन नाट्यस्पर्धेच्या ऑडिशनला गेले असता त्यांचे कोकणी हेलाचे मराठी ऐकून दाजी भाटवडेकरांनी हे गोव्याचं मडकं आहे म्हणून त्यांना नापास केले होते. परंतु आपले हे कोकणी हेल जाऊन शुद्ध मराठी बोलता यावे यासाठी ज्येष्ठ समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांच्या वर्गांना ते जाऊन बसत. पुढे अनेक वर्षांनंतर नाट्यप्रयोग पाहायला आलेल्या या आपल्या गुरूंचा चरणस्पर्श करून त्याविषयीची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली होती. सुरवातीच्या काळात अगदी बालगंधर्वांचे अनुकरण करीत गात असल्याचे पाहून त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना दटावत स्वतःची स्वतंत्र गायकी निर्माण करण्याची प्रेरणा दिली होती. गोमंतकीय गायकांप्रमाणे रामदास कामतांचे गाणेही थोडेसे अनुनासिक जरूर आहे, परंतु शब्द, नाट्यप्रसंग याविषयीची समज असल्याने आपल्या गायकीत त्यानुसार बदलही ते करीत आले हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच एकीकडे साद देती हिमशिखरे, देवाघरचे ज्ञात कुणाला, गुंतता ह्रदय हे, नको विसरू संकेत मीलनाचा, यती मम मन मानीत त्या सारखी अजरामर नाट्यगीते गाणारे रामदास कामत मयूरा रे फुलवीत येई पिसारा, अंबरातल्या निळ्या घनांची सारखी भावगीते किंवा निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, श्रीरंगा कमलाकांतासारखे अभंग आणि प्रथम तुज पाहता जीव वेडावला, विनायका हो सिद्धगणेशा, हे शिवशंकर गिरिजातनया सारखी चित्रपटगीते किंवा उगड तुजी नयनदळां किंवा सूर्य गेला आलतडी, चंद्र पलतडीसारखी अतिशय सुंदर कोकणी गीतेही तितक्याच लोभसपणे गाऊन गेले आहेत. ते आज आपल्यात नसले तरी त्यांची ही सारी गीते अविस्मरणीय आहेत, अजरामर आहेत. नुसते ताना मारणे म्हणजे नाट्यसंगीत नव्हे हे ते आवर्जून सांगत असत.
गोपीनाथ सावकारांसारख्या कुशल नाट्यदिग्दर्शकाच्या तालमीत त्यांच्यातला नट घडला. त्याने चार पाच दशकांची प्रदीर्घ कारकीर्द उभी राहिली. मत्यगंधातील त्यांचा पराशर तर रंगभूमीवर अमर झाला आहे. मानापमानच्या पहिल्या दोन अंकांत राम मराठे आणि नंतरच्या दोन अंकांत रामदास कामत यासारखे राम – रामदासचे धाडसी प्रयोग करायलाही ते कचरले नाहीत. रंगभूमी हे पवित्र स्थळ आहे असे मानणार्‍यांच्या पिढीतील ते एक होते. त्यामुळे तिची सेवा करताना लौकिक जीवनातील सुखदुःखाचे घोट शांतपणे गिळून आपण आपले काम चोख केले नाही तर तिकीट काढून येणार्‍या रसिकांना फसवल्यासारखे होईल याची जाणीव मनात जागी ठेवून ते आणि त्यांच्या पिढीतील नट वावरले. जवळजवळ चार हजार प्रयोगांमधून रामदास कामत यांनी रंगभूमीची ही अहर्निश सेवा केली. अक्षरशः शेकडो नाट्यपदे आणि संवाद त्यांना मुखोद्गत होते. नाट्यनिवृत्तीनंतरही ते रोज दोन तास रियाज करीत. कलाकाराने नेहमी नम्र आणि विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहावे हे त्यांचे सांगणे असे. कलाकारांनी आपल्याला सगळे येते हा भाव सोडावा हा त्यांचा संदेश असे. ज्यांना कलेच्या क्षेत्रात काही करायचे आहे, नाव कमवायचे आहे, त्यांनी हा गुरुमंत्र लक्षात ठेवला तरच रामदास कामतांसारखी उत्तुंगता ते गाठू शकतील!