तपस्या

0
17
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

मनात इच्छा बाळगून व अपेक्षांचे सगळे तंत्र रचून केलेली तपस्या ही स्वार्थी असते. खोटे आरोप काळाच्या चक्रगतीत टिकत नाहीत. सत्य तेवढे युगानुयुगे राहते व असत्य आपोआप नष्ट होते. तपस्येच्या शुद्धतेला व पावित्र्याला कसलाच डाग लागत नाही.

आपल्या साधू-मुनींची परंपरा तपस्या करण्याची होती. जंगलामध्ये वृक्षवल्लरींच्या सोबतीत ते तासन्‌‍तास ध्यानस्थ बसायचे. खरे म्हणजे श्रीशिवशंकर महादेवाने तपस्येची रीत घालून दिली होती. त्याचे ध्यानस्थ रूप नयनमनोहर दिसायचे. जंगलामध्ये आपले ऋषी ध्यानस्थ बसले असताना विरक्तीचा भाव त्यांच्या अंगाअंगामध्ये संचारलेला असायचा. कसल्याच मोहाचे बंधन नाही व मनात कसलीच भीती नाही. वाघ-सिंहासारखी क्रूर जनावरे अवती-भोवती असून त्यांचीदेखील भीती नाही. सापासारखे अतिविषारी जीव जवळपास सरपटत असताना त्यांचीदेखील पर्वा नाही. तपस्या करून देवाकडे काही मागायचे उद्दिष्ट नाही. का करता तपस्या म्हणून विचारले तर त्या प्रश्नाला उत्तरच नाही. तपस्येसाठी तपस्या एवढाच तिचा अर्थ असतो. तपस्येला एकाग्रता अतिशय महत्त्वाची असते.

तपस्या करून शेवटी देव प्रसन्न होऊन प्रकट झाल्यावर ‘काय हवे ते माग’ असे म्हटल्यावर खूप काही मागितलेली उदाहरणे आपल्या पुराणात आहेत. श्रीशिवशंकर महादेव ‘तथास्तु’ म्हणून वर देऊन कित्येकदा अडचणीत सापडलेले आपण पाहिले आहे. ही तपस्या हेतूसह असते. मनात इच्छा बाळगून व अपेक्षांचे सगळे तंत्र रचून केलेली तपस्या ही स्वार्थी असते. देवाला अगोदरच त्या तपस्येचे मर्म कळलेले असते.
निःस्वार्थी व परमार्थी तपस्या ही वेगळ्याच प्रकारची असते. दुसऱ्याच्या हितासाठी कष्टतो तो आत्मा वेगळ्याच प्रकारचा असतो. मनात चांगला हेतू बाळगून जो दिवसरात्र परिश्रम करत असतो तीदेखील त्याची तपस्याच असते. या तपस्येला ध्यानस्थ बसण्याची गरज नाही. चालता-बोलता ही तपस्या होऊ शकते. अशा तपस्व्यांचे मन ओळखायला तेवढेच थोर आणि विशाल मन हवे. आभाळाएवढे भव्य आणि महासागराएवढे खोल असे मन इवल्याशा शरीरात कसे मावेल याचे आश्चर्य वाटेल. जगात असे खूप प्रश्न आहेत की ज्यांना समाधानकारक उत्तरेच नाहीत. एकच सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देतोच कसा? रात्र आणि दिवस हा चमत्कार घडवण्यासाठी पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरतेच कशी? एकच परमेश्वर या जगाचे रहाटगाडगे चालवतोच कसा?

जसे येथे शुद्ध मनाचे महात्मे आहेत, तसेच अशुद्ध मनाचे छळणारेही महाभाग आहेत. कोणताही साधू-संत या अवास्तव निंदेतून सुटला नाही. कधी मनात अविचार न आणताही भलत्याच आरोपाचे धनी या तपस्व्यांना बनावे लागले आहे. दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटणारे हे तपस्वी भोळे-भाबडे नाहीत अथवा मूर्ख नाहीत. सुज्ञपणे त्यांची पावले पुढे-पुढे पडत असतात. पण गैरविचार करणारे अविचारी लोक त्यांच्या या सावध पावलांचा गैरअर्थ घेत असतात व संशयाची तोफ चालवत त्यांना जगणेच नकोसे करून सोडत असतात.

तपस्वी आपले तप सोडत नाहीत. त्यांची तपस्या जीवनभर चालूच असते. पण ज्या कालमर्यादेत अपेक्षित उद्दिष्ट गाठायचे होते तेच लांबणीवर पडते. कार्यसाधनेची दिशा बदलते. हातातील सत्कार्याचा ब्रह्म-घोटाळा होऊन जातो. जे व्हायला हवे होते ते न होता नवीनच चित्र चारी बाजूंनी दिसायला लागते. हा सगळा अनपेक्षित बदल तपस्येच्या उलट दिशेच्या प्रभावाचा असतो.

महाभारतातील श्रीकृष्णाच्या मनात संहार आणि नाश घडवायचा होता का? बिलकूल नाही! शांतिप्रस्ताव घेऊन हस्तिनापूर सम्राट धृतराष्ट्राकडे श्रीकृष्णाने मोठ्या तळमळीने पांडव-कौरव यांच्यामध्ये तडजोड साधण्यासाठी मोठा प्रयत्न केला. दुर्दैव म्हणजे दुर्योधनाचे मनच संशयाने भरलेले होते. पांडवांची बाजू घेतो म्हणून श्रीकृष्णावरदेखील अविचारी दुर्योधनाने आरोप केला. द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर व कुरुश्रेष्ठ भीष्म या थोर तपस्व्यांवरदेखील पांडवांकडे पक्षपाताने तुम्ही ओढले गेले आहात असा निरर्थक व आत्मघातकी आरोप दुर्योधन शेवटपर्यंत करीतच राहिला.
खोटे आरोप काळाच्या चक्रगतीत टिकत नाहीत. सत्य तेवढे युगानुयुगे राहते व असत्य आपोआप नष्ट होते. तपस्येच्या शुद्धतेला व पावित्र्याला कसलाच डाग लागत नाही.